कुंभक्षेत्री ‘नदी संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन

प्रयागराज – आजपर्यंत शासकीय आणि सामाजिक स्तरांवर अनेक उपाययोजना काढूनही गंगा अन् अन्य नद्या शुद्ध होऊ शकल्या नाहीत, ही वस्तूस्थिती आहे. अनेक ठिकाणच्या तीर्थक्षेत्री असलेल्या नद्यांमध्ये पाणी इतके अत्यल्प आहे की, साधू-संत आणि संन्यासी यांना स्नान-संध्या, साधना, तपश्चर्या, धार्मिक विधी, जल अनुष्ठान आदी करता येत नाही. गंगा आणि अन्य सर्व नद्यांच्या अस्तित्वासाठी त्यांचा प्रवाह नैसर्गिक आणि निर्मळ ठेवणे अत्यावश्यक आहे, अन्यथा नद्या प्रदूषित होतात. असे असूनही नद्यांवर धरणे बांधली जात आहेत. त्यामुळे नदी प्रदूषित होण्याला शासन आणि समाज दोघेही उत्तरदायी आहेत. गंगा आणि अन्य नद्या वाचवण्यासाठी त्यांवर बांध अन् धरणे बांधण्याचे थांबवावे आणि प्लास्टिकच्या केवळ वापरावर नव्हे, तर त्याच्या निर्मितीवरच बंदी घातली जावी, असे रोखठोक वक्तव्य ज्योतिष पीठाचे शंकराचार्य जगद्गुरु स्वामी वासुदेवानंद सरस्वती यांनी येथे केले.
कुंभक्षेत्री २० जानेवारी या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या ‘नदी संवाद’ या कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपिठावर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारूदत्त पिंगळे, देहलीतील यमुना नदीच्या स्वच्छतेसाठी कार्यरत असणार्या निरा मिश्रा, महामंडलेश्वर महादेव बाबाजी आदी मान्यवर उपस्थित होते. उत्तरप्रदेशाचे पोलीस उपमहानिरीक्षक श्री. जुगल किशोर तिवारी यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
धर्मशिक्षणाद्वारे हिंदूंच्या मनावर नद्यांचे आध्यात्मिक महत्त्व बिंबवणे, हाच नद्या वाचवण्याचा सर्वोत्तम उपाय ! – सद्गुरु डॉ. चारूदत्त पिंगळे![]() याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सद्गुरु डॉ. चारूदत्त पिंगळे म्हणाले, ‘‘गंगामाता ही भारताची आध्यात्मिक आणि भौतिक जीवनरेषा आहे. सनातन हिंदु संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या आणि पापमुक्त करून मोक्ष प्रदान करणार्या गंगानदीचे अस्तित्व हे आपल्या सर्वांसाठी सदैव सर्वोच्च आहे. गंगा नदीच नव्हे, तर सर्वच सप्तनद्यांना वाचवणे आवश्यक आहे. हे सर्वसामान्यांना घरोघरी जाऊन धर्मशिक्षणाच्या माध्यमातून शिकवणे आवश्यक असून शासनाने तशी व्यवस्था निर्माण करावी. हिंदूंना धर्मशिक्षण घेऊन गंगानदीला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे आवश्यक आहे. गंगा किनारी हिंदूंची अनेक तीर्थक्षेत्रे आणि मंदिरे वसलेली आहेत. त्यामुळे प्रत्येक हिंदूसाठी दोषमुक्ती, साधना आणि तपश्चर्या करण्यासाठी गंगानदी अत्यंत महत्त्वाची आहे. नद्यांचे आध्यात्मिक महत्त्व आणि तिला वाचवण्याची आवश्यकता, यांविषयी शालेय जीवनापासूनच शिकवण दिली गेली पाहिजे. गंगा तट मद्य-मांस मुक्त करणे, हा उपाय नदीच्या शुद्धीसाठी आवश्यक आहे. शासन, प्रशासन आणि समाजातील प्रत्येक घटकाने यासाठी आपले योगदान देत रहाणे, हाच गंगानदी वाचवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. आपण स्वतः नद्या प्रदूषित करू नयेत आणि कुणी करत असतील, तर त्याला रोखले पाहिजे.” |
क्षणचित्रया कार्यक्रमाच्या संयोजकांकडून कार्यक्रमाला उपस्थित असणार्यांना सनातनच्या ‘श्री गंगाजी की महिमा’ या हिंदी भाषेतील ग्रंथाचे वितरण करण्यात आले. |