पिंपरी (पुणे) – इंद्रायणी नदी स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धन जागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित ‘इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉन २०२५’च्या निमित्ताने भोसरीमध्ये पर्यावरणप्रेमींचा कुंभमेळा भरला होता. ३५ सहस्र पर्यावरणप्रेमी, नागरिक, सायकलस्वार फेरीत सहभागी झाले. भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय, अविरत श्रमदान, सायकल मित्र पुणे, महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्यासह विविध स्वयंसेवी संस्था, संघटना आणि पर्यावरणप्रेमी स्वयंसेवकांच्या पुढाकाराने ‘इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉन-२०२५’चे आयोजन करण्यात आले होते. उत्तरप्रदेश येथील प्रभु श्रीराममंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि, संग्रामबापू पठारे महाराज, खासदार श्रीरंग बारणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह आदी या वेळी उपस्थित होते.
फेरीत अपंग बांधवांचा सहभाग लक्षवेधी आणि प्रेरणादायी ठरला. नदीविषयी कृतज्ञता व्यक्त करत गंगा आरती करण्यात आली. इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प आणि जनजागृती करून नदीचे गतवैभव प्राप्त करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचा संकल्प करण्यात आला. ‘यंदाची रॅली महाकुंभ मेळ्याला समर्पित आहे. आपली संस्कृती आणि परंपरा यासाठी कटीबद्ध राहूया’, असे आवाहन आमदार लांडगे यांनी केले.