श्री. प्रीतम नाचणकर, विशेष प्रतिनिधी, ‘सनातन प्रभात’, प्रयागराज

प्रयागराज – कुंभमेळ्यातील विविध मार्गांवर वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. भाविकांना सातत्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. सातत्याने होत असलेल्या या वाहतूक कोंडीमुळे भाविक अक्षरश: त्रस्त झाले आहेत.
१. कुंभक्षेत्रात नियमितपणे केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री आणि अन्य मंत्री, विविध क्षेत्रांतील महनीय व्यक्ती, तसेच विविध आखाड्यांचे प्रमुख येत आहेत. महाकुंभमेळ्यामध्ये महनीय व्यक्तींनी येणे स्वभाविक आहे. याची पूर्वकल्पनाही प्रशासकीय अधिकारी आणि वाहतूक पोलीस यांना देण्यात येते; मात्र त्या तुलनेत वाहतूक नियंत्रणाची व्यवस्था जशी होणे अपेक्षित आहे, तशी होतांना दिसत नाही.
२. महनीय व्यक्ती येणार असल्यास पोलीस अचानक रस्ता बंद करतात. त्यामुळे त्या मार्गावरून येत असलेले शेकडो भाविक आणि वाहने यांना मार्ग पालटावा लागतो. कुंभमेळ्यातील रस्त्यांवर सातत्याने रहदारी असल्यामुळे त्या गर्दीतून मार्ग पालटणे कठीण होत आहे.
३. कुंभक्षेत्रात ठिकठिकाणी चौक आहेत. त्यांवरील वाहतूक बंद केल्यास चारही मार्गांवरून येणार्या वाहनांची चौकांवर गर्दी होते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन नागरिकांसाठीही रस्ता बंद होतो. चौकामध्ये वाहतूक कोंडी झाल्यास रस्ता पूर्ववत् करण्यात अर्धा तास जातो. संपूर्ण कुंभमेळ्यात अशा प्रकारे चौकाचौकात वाहतूक कोंडी नियमितची झाली आहे.
परिणामकारक उपाययोजना काढणे आवश्यक !
कुंभमेळ्यातील अनेक रस्त्यांवर एकाच वेळी शेकडो भाविक आणि त्यांतून मार्ग काढणारी अनेक वाहने यांचा वाहतूक यंत्रणेवर ताण पडत आहे; मात्र यावर उपाययोजना काढणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. ज्या मार्गावरून महनीय व्यक्ती जाणार आहेत, त्या मार्गाच्या प्रारंभी फलक लावल्यास किंवा उद्घोषणेद्वारे नागरिकांना आवाहन केल्यास वाहतूक कोंडी नियंत्रित होण्यास साहाय्य होऊ शकेल. नियमित शेकडो भाविकांचा होणारा खोळंबा लक्षात घेऊन पोलीस आणि प्रशासन यांनी वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना काढणे आवश्यक आहे.
पांटुन पुलांचीही अशीच स्थिती !
कुंभक्षेत्रातील गंगानदीच्या पात्रावर असलेले पांटुन पूल केवळ येण्यासाठी किंवा जाण्यासाठी आहेत. काही पांटुन पूल केवळ महनीय व्यक्तींसाठी ठेवले जातात. ही व्यवस्था सातत्याने पालटत असते. त्यामुळे एखाद्या वेळी पुलावरून जाता येत असल्यास दुसर्या वेळी मात्र पूल जाण्यासाठी बंद असतो. याविषयीची कोणतीही तात्कालिक सूचना पुलाच्या प्रारंभी लावली जात नाही, तसेच त्याविषयी उद्घोषणाही केली जात नाही. पुलावरून जाण्यासाठी पादचारी आणि वाहनचालक पुलाजवळ येतात, तेव्हा पोलिसांचा पहारा पाहूनच हा प्रकार प्रवाशांच्या लक्षात येतो. पुलाच्या जवळ गेल्यावर पोलीस प्रवाशांना जाण्यास मनाई करतात. असे प्रकार सातत्याने होत असल्यामुळे प्रवासी आणि पोलीस यांच्यात वाद होत आहेत.
अमृतस्नानाचा दिवस नसला, तरी महाकुंभमेळ्यात नियमित सहस्रावधी भाविक येत आहेत. त्यामुळे नवीन भाविकांना अचानकपणे रस्ता बंद केल्यास पर्यायी मार्ग कोणता, हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे त्यांच्याजवळील मोठमोठ्या बॅगा आणि अन्य साहित्य घेऊन गर्दीतून अन्य मार्ग शोधणे कठीण होते. या सर्वांचा विचार करून पोलीस आणि प्रशासन यांनी उपाययोजना काढणे आवश्यक आहे.