देहली येथील मराठी साहित्य संमेलनासाठी पुण्यातून विशेष रेल्वे !

१ सहस्र ५०० रुपये तिकीट दर

प्रतिकात्मक चित्र

पुणे – राजधानी देहली येथे होणार्‍या ९८ व्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’स उपस्थित रहाण्यासाठी विशेष रेल्वेचे आयोजन केले आहे. या रेल्वेच्या तिकीट दरांमध्ये कोणतीही सवलत दिली जाणार नाही. तरीही साहित्यप्रेमी, मराठीप्रेमी प्रायोजकांच्या देणगीच्या माध्यमांतून तिकीट दरातील तूट भरून काढण्यात येणार आहे. या रेल्वेचे तिकीट १ सहस्र ५०० रुपये ठेवण्यात आले आहे.

या संमेलनासाठी देहलीला येणार्‍या महाराष्ट्रातील साहित्यप्रेमींसाठी विशेष रेल्वेची मागणी ‘सरहद संस्थे’ने केली होती. केंद्रीय राज्यमंत्री आणि संमेलनाचे सरकार्यवाह खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नाने विशेष रेल्वे संमत करण्यात आली. रेल्वे मंत्रालयाने विशेष रेल्वे संमत करतांना कोणत्याही प्रकारची सवलत देणार नसल्याचे स्पष्ट केले. ही विशेष रेल्वे असल्याने त्यासाठी सामान्य तिकिटापेक्षा तिप्पट रक्कम भरावी लागणार आहे. त्यामुळे १ सहस्र ५०० रुपये भरून रेल्वे प्रवासासाठी नोंदणी करण्याचा निर्णय संयोजन संस्था आणि महामंडळ यांनी घेतला आहे.