अध्यात्म आणि वैदिक तत्त्वज्ञानातील तेजोमय दीपस्तंभ ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

गुरुवर्य डॉ. किसन महाराज साखरे यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी श्रद्धांजली वाहिली !

ह.भ.प. गुरुवर्य डॉ. किसन महाराज साखरे

पुणे – अध्यात्म, वैदिक ज्ञान परंपरेचा निस्सीम साधक म्हणून गुरुवर्य डॉ. किसन महाराज साखरे यांची कार्यसाधना पुढील कित्येक पिढ्यांसाठी दीपस्तंभासारखी तेजोमय राहील, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ निरूपणकार, संत साहित्य आणि अद्वैत वेदांत तत्त्वज्ञानाचे श्रेष्ठ अभ्यासक गुरुवर्य डॉ. किसन महाराज साखरे यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण केली आहे. ‘त्यांनी साधकाश्रमाच्या माध्यमातून चालू केलेले कार्य महत्त्वपूर्ण आहे. त्यांचा साधक परिवार, तसेच कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची ताकद मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना ! ब्रह्मलीन गुरुवर्य डॉ. किसन महाराज साखरे यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी शोकसंदेशात म्हटले.

अद्वैत वेदांत तत्त्वज्ञानाचा तळपता ज्ञानसूर्य मावळला ! – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

वारकरी संप्रदायातील ऋषितुल्य व्यक्तीमत्त्व, शेकडो ग्रंथाचे सिद्धहस्त लेखक, महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार प्राप्त विद्वान, सहस्रो वारकरी साधकांना घडवणारे गुरुवर्य हरिभक्तीपरायण डॉ. किसन महाराज साखरे ब्रह्मलीन झाल्याचे वृत्त दुःखद आहे. महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली !

आध्यात्मिक क्षेत्रातील ज्ञानतारा निखळला ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

संत साहित्याचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ कीर्तनकार आणि वारकरी संप्रदायाचे अर्ध्वयू डॉ. किसन महाराज साखरे यांच्या निधनाने आध्यात्मिक क्षेत्रातील ज्ञानतारा निखळला आहे.