Prayagraj Kumbh Parva 2025 : कुंभमेळ्यात साकारली लक्षवेधी ८५ फूट उंच ‘तेजस विमाना’ची प्रतिकृती !

प्रयागराज कुंभपर्व २०२५

शिबिराच्या प्रवेशद्वारावर भारतीय हवाई दलाच्या ‘तेजस विमाना’ची ८५ फूट उंच प्रतिकृती

प्रयागराज, २१ जानेवारी (वार्ता.) : त्रिवेणी बांध, दारागंज येथील रामानंदाचार्य मठाचे शिबीर कुंभमेळ्यात उभारण्यात आले आहे. या शिबिराच्या प्रवेशद्वारावर भारतीय हवाई दलाच्या ‘तेजस विमाना’ची ८५ फूट उंच प्रतिकृती साकारण्यात आली आहे. त्यामुळे हे शिबीर कुंभमेळ्यात येणार्‍या सर्व भाविकांना आकर्षित करत आहे.

रामानंदाचार्य मठाचे महंत बृजभूषण दासजी महाराज यांची ‘सनातन प्रभात’ने भेट घेतली. त्या वेळी त्यांनी सांगितले की, धर्मकार्य करण्यासमवेत स्वत: प्रखर राष्ट्रभक्त असल्याने तेजस विमानाची प्रतिकृती सिद्ध करण्याची संकल्पना त्यांनी साकारली आहे. तेजस विमान हे प्रचंड शक्तीशाली असून भारतीय हवाई दलाची ती शान आहे. ही प्रतिकृती साकार करण्यासाठी बंगाल येथून आलेल्या १५ कारागिरांना दीड महिन्याचा कालावधी लागला. देश-विदेशातून कुंभमेळ्यात येणार्‍या भाविकांपर्यंत तेजस विमानाचा प्रसार करण्याचा आमचा उद्देश आहे. या शिबिरात अन्नदान होते आणि प्रतिदिन भागवत कथावाचनही केले जात आहे.