दुकानदारांचे रस्ताबंद आंदोलन आणि कारवाई यांमागील सत्यतेविषयी ‘सनातन प्रभात’चे घटनास्थळावरून वृत्तांकन !
– श्री. प्रीतम नाचणकर, विशेष प्रतिनिधी, प्रयागराज

प्रयागराज, २१ जानेवारी (वार्ता.) – वारंवार सूचना देऊनही महाकुंभमेळ्यातील सेक्टर ५ मध्ये गंगोली शिवाली मार्गावरील खाक चौकातील अवैध दुकाने हटवण्यात न आल्याने २१ जानेवारी या दिवशी या दुकानांवर प्रशासनाने कारवाई केली. मोठ्या पोलीस पहार्यात प्रशासनाने जेसीबीद्वारा ७ दुकानांवर कारवाई केली. या वेळी दुकानदारांनी प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत रस्ता बंद आंदोलन केल्याने या भागात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आंदोलकांनी रस्ता अडवल्याने वाहतूक थांबली होती. त्यामुळे पोलीस कुमक बोलावून आंदोलकांना हटवण्यात आले.
साधारण दुपारी १२ वाजता प्रशासनाने एका जेसीबीद्वारे दुकानांवर कारवाई केली. या कारवाईनंतर सर्व दुकानदार आणि त्यांचे कुटुंबीय यांनी रस्त्यावर उतरून प्रशासनाचा निषेध केला. या वेळी आंदोलनकर्त्यांनी या सेक्टरमधील प्रयागराज मेला प्राधिकरणाच्या कार्यालयाबाहेर घोषणाबाजी केली. ‘सनातन प्रभात’ने कारवाई करण्यात आलेल्या दुकानदारांना भेटून त्यांचे म्हणणे समजून घेतले. काही दुकानदारांनी प्रशासकीय अधिकार्यांनी दुकानाचे भाडे घेऊन दुकान तोडल्याचे म्हटले. एका दुकानदाराने, ‘मी २२ वर्षे दुकान लावतो. मेळा संपल्यावर मी पैसे देतो’, असे सांगितले. अन्य एका दुकानदाराने प्रशासनाने नोटीस न देता कारवाई केल्याचे सांगितले, तर एका दुकानदाराने वारंवार प्रशासकीय कार्यालयात जाऊनही अनुमती देण्याचे केवळ आश्वासन देण्यात आले, अशी माहिती दिली.
यासाठी कारवाई आवश्यक असल्याचे अधिकार्यांनी सांगितले….
‘सनातन प्रभात’ने प्रयागराज मेळा प्राधिकरणाच्या सेक्टर ५ मधील मेला व्यवस्थापक राजकुमार बैठा यांची भेट घेतली. त्या वेळी ते म्हणाले, जेवढ्या दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे, ती सर्व दुकाने अवैध आहेत. ज्या मार्गावरील दुकाने तोडण्यात आली आहेत, तो स्नानाचा मुख्य मार्ग आहे. या मार्गावरून मोठ्या शोभायात्रा जाणार आहेत. त्यात सहस्रावधी गाड्या, हत्ती, उंट यांचा समावेश असणार आहे. अवैध दुकाने हटवली नाहीत, तर शोभायात्रा काढता येणार नाही. या मार्गावर दुकाने न लावण्याविषयी सातत्याने सूचना देण्यात आली होती; मात्र तरीही येथे दुकाने उभारण्यात आली. अवैध दुकानांना नोटीस देत राहिलो, तर आम्हाला व्यवस्थापनाची अन्य कामे करताच येणार नाहीत. २ दिवसांपूर्वी सेक्टर १९ मध्ये आग लागली; मात्र तेथपर्यंत अग्नीशमन दलाच्या गाड्या पोचण्यास अडथळा आला. त्यामुळे अवैध दुकानांवर कारवाई करणे आवश्यक आहे.
दलाल पैसे घेत आहेत का ? याविषयी चौकशी आवश्यक !
या वेळी काही दुकानदारांनी ‘सनातन प्रभात’ला अधिकार्यांनी दुकान लावण्यासाठी पैसे घेतल्याचे म्हटले. याविषयी नेमके कुणी पैसे घेतले ? प्रशासकीय अधिकार्यांच्या नावाने कुणी दलाल पैसे घेत आहेत का ? याविषयी चौकशी होणे आवश्यक आहे.