बांगलादेशात गेल्या ऑगस्ट मासापासून चालू असलेल्या हिंसाचारामध्ये घट झालेली नसतांना आता त्याच्या पुढचा टप्पा म्हणून बांगलादेशाला अधिकृतरित्या ‘इस्लामी’ देश घोषित करण्याचा प्रयत्न होत आहे. ज्यांनी शेख हसीना यांना सत्ताच्युत करून पलायन करण्यास भाग पाडले, ते कट्टरतावादी मुसलमान आहेत आणि त्यांचे लक्ष्य बांगलादेशाला कट्टर इस्लामी देश करण्याचे आहे, हे लपून राहिलेले नाही. गेल्या ६ मासांमध्ये ते प्रतिदिन दिसून येत आहे. बांगलादेश हिंदुविहीन देश करण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत, हे दिसत आहे. हिंदूंना ठार करण्यासह त्यांच्यावर आर्थिक बहिष्कार घालण्याचा प्रयत्न होत आहे. हिंदूंच्या उपाहारगृहांना लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे हिंदूंची उपाहारगृहे बंद होऊ लागली आहेत. हिंदूंचे जगणे कठीण करण्यात येत आहे. इतके होऊन भारताने वरवरचे प्रयत्न केल्याचे दाखवण्यापलीकडे काहीही केले नाही आणि जागतिक समुदायही यावर काहीच बोलत नाही अन् कृती करत नाही. त्यामुळे बांगलादेशातील कट्टरतावाद्यांचे फावले आहे. अशाच घटना जर भारतातील हिंदूंनी अल्पसंख्यांकांच्या विरोधात केल्या असत्या, तर एकजात सर्व देश भारतावर तुटून पडले असते. असे बांगलादेशाच्या संदर्भात होतांना दिसत नाही. बांगलादेशात सत्तापालट झाल्यानंतर ‘राज्यघटना सुधार आयोगा’ची स्थापना करण्यात आली होती. या आयोगाने अहवाल सादर केला असून त्यात त्याने राज्यघटनेतील प्रस्तावनेतून ‘राष्ट्रवाद’, ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवाद’ हे शब्द काढण्याची शिफारस केली आहे. याचाच अर्थ तेथे ‘इस्लामी देश’ शब्द घालण्यात येणार आहे, हे वेगळे सांगायला नको.
लोकशाहीचे अस्तित्व नसलेला देश
बांगलादेशात लोकशाही आहे, हे खरे असले, तरी ती हिंदूंना कधी दिसून आलेली नाही. ऑगस्टपासून हिंदूंना लक्ष्य केले जात असले, तरी वर्ष १९७१ ला पाकिस्तानपासून वेगळे होऊन बांगलादेशाची निर्मिती झाल्यानंतरही हिंदूंवरील आक्रमणे थांबलेली नव्हती. २२ टक्के असणारे हिंदू आता ८ टक्के राहिले आहेत. हे लोकशाही असतांनाच घडलेले आहे. त्यामुळे आता तेथील लोकशाही जाऊन तो देश शरीयत कायद्यानुसार चालू लागला, तरी हिंदूंच्या संदर्भात जे आधी चालू होते, ते चालूच रहाणार आहे. बांगलादेशात लोकशाहीनुसार निवडून आलेल्या शेख हसीना गेली १० वर्षे पंतप्रधान असतांनाही तेथे हिंदूंवर आक्रमणे चालूच होती. स्वतः शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षातील कट्टरतावाद्यांकडून हिंदूंवर आक्रमणे केली जात होती. ती थांबवण्याची मागणी कधी भारताने शेख हसीना यांच्याकडे केली नाही. वास्तविक भारताशी शेख हसीना यांचे जवळचे संबंध असतांना ही स्थिती होती. आता लोकशाही नसल्यावर भेद इतकाच होणार की, हिंदूंवरील अत्याचार अधिकृत असतील आणि ते इस्लामी राष्ट्रानुसार योग्य असतील. यातून हिंदूंचा वंशसंहार होणार, हे तितकेच खरे आहे.
इस्लामी बांगलादेशातील हिंदूंचे काय होणार ?
‘बांगलादेशाला इस्लामी राष्ट्र घोषित केल्यावर तेथील अल्पसंख्यांकांचे काय होणार ?’, असा प्रश्न तेथे कुणीही कुणाला विचारणार नाही किंबहुना आजही तसा प्रश्न कुणी उपस्थित करतांना दिसत नाही; कारण बांगलादेशात कुणी पुरोगामी नाही आणि निधर्मीवादीही नाही. जे आहेत, ते सर्व कट्टर मुसलमान आहेत; कारण फाळणीच्या वेळी पूर्व पाकिस्तान मुसलमान बहुसंख्य म्हणूनच पाकिस्तानचा घटक होता. नंतर नेहमीप्रमाणे मुसलमान आपापसांत भांडतात, त्यानुसार पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान भांडू लागले अन् भारताने मध्यस्थी करत पूर्व पाकिस्तान म्हणजे नवीन ‘बांगलादेश’ या देशाची निर्मिती केली. तरीही तेथे कुणी भारतप्रेमी, हिंदुप्रेमी निर्माण झाला नाही, हे आताच्या स्थितीवरून लक्षात येते. त्यामुळे बांगलादेशाला इस्लामी देश घोषित करण्याच्या प्रयत्नावर कुणीच आक्षेप घेणार नाही. उलट भारतात गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची मागणी करत असतांना तथाकथित निधर्मीवादी याला विरोध करत ‘भारतातील अल्पसंख्यांकांचे हिंदु राष्ट्रात काय होणार ?’, असे प्रश्न विचारत असतात. यातून दोन्ही मानसिकतेत किती भेद आहे, हे लक्षात येते. जर बांगलादेशाला राज्यघटनेतून ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवाद’ शब्द काढून तेथे इस्लामी देश घोषित करता येणे शक्य होणार आहे, तर मग भारतातील राज्यघटनेच्या प्रस्तावनेतून हेच दोन शब्द काढून तेथे ‘हिंदु राष्ट्र’ शब्द घालायला काय अडचण आहे ? जे बांगलादेशात अल्पसंख्यांकांचे होत आहे, तसे भारतात कुठेच होतांना कधीच दिसले नाही. उलट भारतात ८ राज्यांत हिंदू अल्पसंख्य असून त्यांना तेथे मार खावा लागतो. इतकेच नाही, तर ज्या राज्यांत हिंदू बहुसंख्य आहेत, तेथेही ते मुसलमानांकडून मार खात असतात, हे प्रतिदिन दिसते. भारताला हिंदु राष्ट्र घोषित केल्यावर हे थांबवता येईल. भारतात हिंदूंना महत्त्व मिळेल. हिंदूंना अधिकार मिळतील आणि हिंदूंचे सर्व प्रकारे रक्षण केले जाईल. इस्लामी देशात असे पहायला मिळत नाही. इस्लामी देशांत मुसलमान आपापसांत हिंसाचार करून एकमेकांचे जीव घेत असतात. मशिदीमध्ये बाँबस्फोट घडवत असतात.
‘ट्रम्प इफेक्ट’ची अपेक्षा !
अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डॉनल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांनी अनेक आदेश दिले आहेत. ट्रम्प यांच्यामुळे हमास-इस्रायल युद्ध थांबले आणि युक्रेन-रशिया युद्ध ते थांबवणार आहेत. तिसरे महायुद्धही ते होऊ देणार नाहीत. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी निवडणुकीतील प्रचाराच्या वेळी बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणाचे आश्वासन दिले होते. आता ट्रम्प बांगलादेशाच्या संदर्भात काय निर्णय घेणार आहेत ?, याकडे आता लक्ष लागले आहे. मुळात बांगलादेशातील सध्याच्या स्थितीमागे अमेरिकेचे पूर्वीचे जो बायडेन यांचे सरकार असल्याचे म्हटले जाते. त्यांनीच महंमद युनूस यांना अंतरिम सरकारच्या प्रमुखपदावर बसवले आहे. आता ट्रम्प त्यांना हटवणार का ? त्यांच्या जागी पुन्हा भारत समर्थक व्यक्ती बसवणार का ? तेथील हिंदूंचे रक्षण करण्यासाठी काय निर्णय घेतले जाणार ?, हे पहावे लागणार आहे. भारतातील सरकार कदाचित् याच कारणामुळे आतापर्यंत बांगलादेशाच्या संदर्भात कोणताही ठोस निर्णय घेण्याचे टाळत होते का ? अशी शक्यता आहे. त्यामुळे आता ट्रम्प सरकारच्या माध्यमांतून बांगलादेशातील स्थिती पालटून भारताच्या दृष्टीने पुन्हा अनुकूल करवून घेण्याचा भारताचा प्रयत्न असू शकतो, अशी चर्चा आहे.
बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी आश्वासन दिल्यानुसार डॉनल्ड ट्रम्प काही कृती करतील, अशी भारतासह बांगलादेशातील हिंदूंची अपेक्षा ! |