कुंभमेळ्यात महिलांना कपडे पालटण्यासाठी असलेली आडोसा केंद्रे खालून दीड फूट उघडी !

महिलांना कपडे पालटण्यासाठी असलेली पत्र्याची आडोसा केंद्रे

प्रयागराज, २१ जानेवारी (वार्ता.) – त्रिवेणी संगमावर आणि गंगानदीच्या तिरावर स्नान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे स्नान केल्यानंतर महिलांना कपडे पालटण्यासाठी प्रशासनाद्वारे साधारण १० फूट उंच आणि ८ फूट लांब पत्र्याची आडोसा केंद्रे उभारण्यात आली आहेत. ही आडोसा केंद्रे खालून साधारण दीड फूट उघडी आहेत. त्यामुळे त्यामध्ये कपडे पालटणारी व्यक्तीचे साधारण गुडघ्यापर्यंत पाय दिसतात. महिलांच्या दृष्टीने प्रशासनाने खालपासून सर्व भाग झाकला जाईल, अशा पद्धतीने या आडोसा केंद्रांची रचना करणे अपेक्षित होते.

वाळूमध्ये रोवण्यात आलेली आडोसा केंद्रे

ही पत्र्याची आडोसा केंद्रे वाळूवर ठेवण्यात येतात. कुंभमेळ्यात असलेले कायमस्वरूपी आणि तात्पुरत्या अशा सर्व घाटांवर महिलांना कपडे पालटण्यासाठी अशा प्रकारची आडोसा केंद्रे ठेवण्यात आली आहेत. यांतील काही ठिकाणी आडोसा केंद्रे वाळूमध्ये रोवण्यात आली आहेत. काही भाग वाळूत गेल्यामुळे खालून उघडा असलेला भाग अल्प होत आहे; मात्र बहुतांश ठिकाणी ही आडोसा केंद्रे वाळूवर तशीच ठेवण्यात आल्याने दीड फुटापर्यंत ती खालून उघडी आहेत. महिलांना कपडे पालटतांना पूर्ण आडोसा द्यायला हवा, हे साधारण सूत्रही प्रशासनाच्या लक्षात आले नसल्याविषयी भाविकांकडून आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. यामध्ये प्रशासनाने सुधारणा करावी, असे मतही काही महिला भाविकांनी ‘सनातन प्रभात’कडे व्यक्त केले.