कांगडा (हिमाचल प्रदेश) येथील श्री ज्वालामुखीदेवीचे श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी घेतले भावपूर्ण दर्शन !

कांगडा (हिमाचल प्रदेश) – सप्तर्षींच्या आज्ञेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी कांगडा (हिमाचल प्रदेश) येथील शक्तिपीठ श्री ज्वालामुखीदेवीचे २२ जुलै २०२४ या दिवशी भावपूर्ण दर्शन घेतले. या वेळी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी श्री ज्वालामुखीदेवीचे पूजन करून ‘येणार्‍या आपत्काळात सर्वत्रच्या साधकांचे रक्षण व्हावे, त्यांचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास दूर व्हावेत अन् हिंदु राष्ट्र स्थापनेतील सूक्ष्मातील अडथळे दूर होऊन लवकरात लवकर त्याची स्थापना व्हावी’, यांसाठी प्रार्थना केली.

श्री ज्वालामुखीदेवी माहात्म्य !

श्री ज्वालामुखीदेवी ही ५१ शक्तिपीठांपैकी एक आहे, तसेच हे ‘धुमादेवीचे स्थान’ असल्याचे म्हटले जाते. श्री चिंतपूर्णीदेवी, श्री नयनादेवी, श्री शाकंभरीदेवी शक्तिपीठ, श्री विंध्यवासिनी शक्तिपीठ आणि श्री वैष्णोदेवी यांच्याप्रमाणेच हे सिद्ध स्थान आहे. येथे भगवती सतीची महाजिव्हा (महाजीभ) भगवान विष्णूच्या सुदर्शनचक्राने कापली गेली आणि ती येथे पडली. मंदिरात देवी भगवती ९ ज्योतींच्या रूपात दिसते, ज्यांची नावे अनुक्रमे श्री महाकाली, श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती, श्री हिंगलाज भवानी, श्री विंध्यवासिनी, श्री अन्नपूर्णा, श्री चंडीदेवी, श्री अंजनादेवी आणि श्री अंबिकादेवी अशी आहेत. उत्तर भारतातील प्रसिद्ध ९ देवींच्या दर्शनाच्या वेळी चौथे दर्शन आई श्री ज्वालादेवीचे आहे. हे आद्यशंकराचार्यांनी लिहिलेल्या ‘अष्टदश महाशक्तिपीठ स्तोत्रां’तर्गत आहे. या स्तोत्रात श्री ज्वालादेवीला ‘वैष्णवी’ म्हटले आहे. आध्यात्मिक शांतीसाठी वर्षभर सहस्रो भाविक तेथे यात्रेला जातात.

ज्वालामुखी हे अनेक वर्षांपासून तीर्थक्षेत्र आहे. मोगल सम्राट अकबराने एकदा लोखंडी पत्र्याने येथे असलेल्या ज्वाला झाकण्याचा प्रयत्न केला आणि त्या पाण्याने विझवल्या; पण ज्वालांनी हे सर्व प्रयत्न हाणून पाडले. त्यानंतर अकबराने मंदिरात सोन्याची छत्री दिली आणि क्षमा मागितली; मात्र देवीच्या समोर उद्धटपणे बोलल्यामुळे देवीने सोन्याच्या छत्रीचे विचित्र धातूमध्ये रूपांतर केले, जे अद्याप अज्ञात आहे. या घटनेनंतर त्याची देवीवरची श्रद्धा अधिकच दृढ झाली.