Jharkhand ‘Little Bangladesh’ : झारखंडमधील बांगलादेशी घुसखोरीच्या प्रकरणांची राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेमार्फत चौकशी करा !

  • भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांची मागणी

  • झारखंडला ‘छोटा बांगलादेश’ बनवण्याचे षड्यंत्र रचले गेल्याचीही दावा !

रायपूर – झारखंडमधील बांगलादेशी घुसखोरांच्या समस्येवर माजी मुख्यमंत्री आणि  भाजपचे प्रदेशाध्यक्ष बाबूलाल मरांडी यांनी आवाज उठवला आहे. झारखंडला ‘छोटा बांगलादेश’ बनवण्याचे षड्यंत्र रचले गेल्याचा दावाही मरांडी यांनी केला आहे. बांगलादेशी घुसखोरीची दाहकता लक्षात येण्यासाठी त्यांनी झारखंड उच्च न्यायालयाने केलेल्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला. काही दिवसांपूर्वी राज्यातील संथाल परगणा भागातील ‘लँड जिहाद’च्या विरोधात प्रविष्ट केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करतांना झारखंड उच्च न्यायालयाने या समस्येविषयी चिंता व्यक्त केली. न्यायालयाने बांगलादेशी घुसखोरांची ओळख पटवून त्यांच्या प्रत्यार्पणासाठी राज्य सरकारला कृती योजना बनवण्याचा, तसेच या प्रकरणी २ आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिला. मरांडी यांनी बांगलादेशी घुसखोरीचे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेमार्फत (‘एन्.आय.ए.’मार्फत) अन्वेषण करण्याची मागणी केली.

झारखंड ‘छोटा बांगलादेश’- बाबूलाल मरांडी

झारखंडमधील बांगलादेशी घुसखोरांना मिळत आहेत आर्थिक लाभ !

झारखंडमध्ये बांगलादेशी घुसखोरांच्या वाढत्या प्रभावाचा फटका आदिवासी समाजाला बसत आहे. अवैध मदरसे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. धर्मांध युवक आदिवासी समाजातील मुलींना फसवून त्यांच्याशी लग्न करतात. नंतर या तरुणींना पंचायत निवडणुकीत उमेदवारी दिली जाते. अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. कुटुंबात लोकप्रतिनिधीचे पद आल्यानंतर हे धर्मांध त्याआडून अमली पदार्थांचा व्यवसायही करतात. यासह त्यांच्या अन्य घुसखोर बांधवांना सरकारी कागदपत्रे बनवून देण्यासाठी, तसेच सरकारी लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात.

झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस यांच्या युती सरकारवर गंभीर आरोप

सत्तेत असलेल्या झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस यांचे युती सरकार बांगलादेशी घुसखोरांना अभय देते. त्यांना बनावट सरकारी कागदपत्रे बनवून झारखंडमध्ये स्थायिक करते, असा आरोप बाबूलाल मरांडी यांनी केला आहे. त्यामुळे बांगलादेशी घुसखोरांवर हे सरकार कारवाई करील, अशी अपेक्षा बाळगणे चुकीचे आहे, असे मरांडी यांनी म्हटले आहे.

झारखंडमधील शाळेत शिकवले जाते बांगलादेश आणि पाकिस्तान देशांचे राष्ट्रगीत !

मरांडी यांनी ४ वर्षांपूर्वी झारखंडमधील एका शाळेत घडलेल्या घटनेची माहिती सामाजिक संकेतस्थळावर दिली आहे. राज्यातील ‘नंदलाल स्मृती विद्या मंदिर’ नावाच्या शाळेत विद्यार्थ्यांना भारताचे नव्हे, तर पाकिस्तान आणि बांगलादेश यांचे राष्ट्रगीत पाठ करण्याचा गृहपाठ देण्यात आला होता. ‘हा योगायोग नसून झारखंडची आदिवासी ओळख पुसून टाकण्याचे घातक षड्यंत्र आहे’, असे मरांडी यांनी म्हटले आहे. देशविरोधी कारवायांमध्ये गुंतलेल्या ही शाळा चालवणार्‍या आणि त्यास निधी पुरवणार्‍या टोळीची सखोल चौकशी करण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. पालकांनी सांगितले की, ते आपल्या मुलांना पाकिस्तान आणि बांगलादेशचे राष्ट्र्रगीत वाचू देणार नाहीत. पालकांच्या विरोधानंतर शाळेच्या व्यवस्थापनाला हे काम मागे घ्यावे लागले.

संपादकीय भूमिका

वास्तविक अशी मागणी करण्याची वेळी भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांवर येऊ नये. बांगलादेशी घुसखोरी ही राष्ट्रीय समस्या असून या घुसखोरांना आताच हाकलून दिले नाही, तर भारताची पुन्हा फाळणी व्हायला वेळ लागणार नाही !