‘विठुमाऊली तू, माऊली जगाची’, असा विठ्ठलमहिमा आळवत लक्षावधी वारकरी प्रतिवर्षी वारीला जातात आणि परत आल्यावर स्वतःपुरतीच नव्हे, तर परिसरातही विठ्ठलाची उपासना उत्साहाने चालू करतात.
१. अध्यात्ममार्गावरील अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि भक्ती. श्रद्धा दृढ होण्यासाठी वारीचे प्रयोजन आहे – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ
२. ‘भजन, नामस्मरण आणि कीर्तन यांच्या माध्यमातून परमेश्वराला प्राप्त करणे’, हा वारकरी पंथाचा सरळसोपा मार्ग आहे. भागवत संप्रदायात याला ‘नवविधा भक्ती’ म्हणतात. श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन या ९ भक्ती एक ‘वारी’ केल्यास सिद्ध होतात अन् ‘याची देही याची डोळा’ माणसाचे जीवन कृतार्थ होते. हा वारीचा मूळ गाभा आहे. (संदर्भ : त्रैमासिक ‘सद्धर्म’, जुलै २०१७)
पांडुरंगाचे भक्त आद्य शंकराचार्य !
आद्य शंकराचार्यांनी श्री विठ्ठलाच्या भक्तीने वेडेपिसे होऊन ‘पांडुरंगाष्टकम्’ स्तोत्राची रचना करणे : ‘शंकराचार्य हे शैवपंथी होते’, हे म्हणणे चुकीचे आहे. त्यांनी शंकर आणि श्रीविष्णु यांची स्तोत्रे गायिली आहेत. आद्य शंकराचार्य पंढरपूरला गेले असतांना त्यांनी पांडुरंगाचे दर्शन घेतले. त्या वेळी विठ्ठलावरील भक्तीने ते वेडेपिसे झाले. पांडुरंगाने त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिले. त्या स्वरूप संधानातून त्यांच्या मुखातून पांडुरंगाची जी स्तुती बाहेर पडली, तेच ‘पांडुरंगाष्टकम् स्तोत्र’ होय. शंकराचार्य म्हणतात, ‘हा परब्रह्माचे चिन्ह असल्यामुळे मी त्याला भजतो. तो महान कर्मयोगी, ज्ञानाचा उद्गाता आणि प्रेमाचा सागर आहे. अशा परब्रह्म पांडुरंगाला मी नमस्कार करतो.’
३. वैयक्तिक जीवनातील अभिनिवेष बाजूला ठेवून ईश्वराच्या नामस्मरणात देहभान विसरायला लावणारा आध्यात्मिक सोहळा म्हणजे पंढरपूरची वारी !
भक्तीमय वातावरणात वाटचाल करणारे वारकरी !
वारीत ‘तृण आणि पाषाण तेही जीव मानावे’, असे मानणार्या संतांच्या भूमिकेत राहून (ते जीव दुखवू नयेत; म्हणून) अनवाणी चालणारे हे वारकरी भगव्या पताका घेऊन भक्तीभावाची उधळण करत; चिपळ्या, टाळ आणि मृदंग यांच्या नादात मोठ्या आनंदाने नाचत हरिपाठ म्हणत जात असतात. त्यामुळे सभोवतालचे सर्व वातावरण भक्तीमय होऊन जाते.
सर्वांचा अहंकार न्यून होऊन ते आनंदात डुंबून जातात. भक्ती हा भारतीय समाजाचा गाभा आहे. महाराष्ट्र आणि अन्य ठिकाणच्या कानाकोपर्यातून येणारे वारकरी अन् भाविक वर्षभर जमवलेला पै-पैसा व्यय (खर्च) करून वारीला येतात. ते अत्यल्प सामान घेऊन, हातांत टाळ आणि मुखात ‘माऊली’च्या नामाचा गजर करत अत्यंत आनंदात वाटचाल करत असतात.
– परात्पर गुरु (कै.) परशराम पांडे
४. ‘बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल। करावा विठ्ठल जीवभाव॥’
वारीमध्ये या अभंगाची प्रचीती प्रत्येक वारकरी आणि विठ्ठलभक्त घेत असतो. नव्हे, तर पंढरीचा विठ्ठल हा वारकर्यांचा श्वासच आहे. त्याच्या नामाविना त्यांचे कोणतेच कर्म होत नसते. अशा भगवद्भक्त असलेल्या वारकर्यांचा महासंगम पंढरपूर यात्रेच्या म्हणजेच वारीच्या निमित्ताने होत असतो.
५. अलौकिक, अद्भुत आणि टाळ-मृदुंगाच्या गजरात हर्षभरे डोलणारा आसमंत म्हणजे अविस्मरणीय अशी पंढरीची वारी !
पंढरीची वारी म्हणजे जणू भक्तीचा महासागर ! ‘देवासाठी तहान-भूक विसरून विठ्ठल दर्शनाचा एकच ध्यास ठेवून भाव-भक्तीने पंढरपूरच्या वाटेने निघालेले वारकरी, म्हणजे जणू देवाच्या भक्तीचा महासागरच ! भक्तीचा हा महासागर देवाच्या अमृतानंदात धुंद होऊन एकच गजर करतो, ‘अवघे गरजे पंढरपूर, चालला विठूनामाचा गजर, चालला विठूनामाचा गजर !’
६. वारी म्हणजे आनंदाने ओसंडून वहाणारे स्नेहसंमेलन !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या दृष्टीने वारी हे आनंदाने ओसंडून वहाणारे एक स्नेहसंमेलनच होय. केवळ पायी चालत, टाळ कुटत जाणारे लोक वारकरी नसून पदोपदी ज्यांना देवाची प्रचीती येते, ती वारी. वारीमुळे अहंकार विसरून एकमेकांच्या पायी लोटांगण घालणारे वैष्णव दिसतात.
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ