Farooq Abdullah Warns : भारताचा संयम सुटला, तर युद्ध होईल !

कठुआ येथील आक्रमणानंतर जम्‍मू-काश्‍मीरचे माजी मुख्‍यमंत्री फारुख अब्‍दुल्ला यांचे वक्‍तव्‍य

श्रीनगर (जम्‍मू-काश्‍मीर) – गेल्‍या काही दिवसांत सातत्‍याने होत असलेल्‍या जिहादी आतंकवादी आक्रमणांवर जम्‍मू-काश्‍मीरचे माजी मुख्‍यमंत्री आणि नॅशनल कॉन्‍फरन्‍सचे अध्‍यक्ष डॉ. फारुख अब्‍दुल्ला यांनी वक्‍तव्‍य केले आहे. ते म्‍हणाले की, जगातील कोणताही देश आतंकतवाद स्‍वीकारण्‍यास सिद्ध नाही. भारताचा संयम सुटू शकतो आणि युद्ध होऊ शकते. पाकिस्‍तानला हा आतंकवाद उद़्‍ध्‍वस्‍त करून टाकेल आणि युद्धाने दोन्‍ही देशांचा केवळ विनाशच होईल. कृपया आतंकवाद थांबवा !

१. दुसरीकडे लोकसभेतील विरोधी पक्षनेते काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी म्‍हटले की, आमच्‍या सैन्‍यावरील ही भ्‍याड आक्रमणे अत्‍यंत निंदनीय आहेत. महिनाभरात झालेले पाचवे आतंकवादी आक्रमण हा देशाच्‍या सुरक्षेला आणि आपल्‍या सैनिकांच्‍या जिवाला मोठा धक्‍का आहे. सध्‍या चालू असलेल्‍या आतंकवादी आक्रमणांवर ठोस कृतीतूनच तोडगा निघेल.


२. केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह म्‍हणाले, ‘‘यूपीएचे सरकार असतांना तेलंगाणापासून ओडिशापर्यंत देशभरात ठिकठिकाणी बाँबस्‍फोट व्‍हायचे, पण आज जसे उंदीर बिळात घुसतात, तसे आतंकवादी बिळात घुसत आहेत. काश्‍मीरमध्‍येही तेच होत आहे. काँग्रेसने काश्‍मीरच्‍या सैन्‍याचे, निमलष्‍करी दलाचे आणि सैनिकांचे मनोधैर्य खचू देऊ नये.’’

३. संरक्षणतज्ञ प्रफुल्ल बक्षी यांनी सांगितले की, संपूर्ण जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये ‘स्‍लीपर सेल’ (आतंकवाद्यांना साहाय्‍य करणारे सर्वसाधारण लोकांचे छुपे गट) आहेत, जे आतंकवाद्यांना पाठिंबा देत आहेत. शेवटी आतंकवाद्यांना रहाण्‍यासाठी जागा कोण देत आहे, त्‍यांना शस्‍त्रे कोण देत आहेत ?

संपादकीय भूमिका

नेहमीच पाकिस्‍तानची भाषा बोलणारे फारुक अब्‍दुल्ला यांच्‍या अशा वक्‍तव्‍यांवरून लवकरच होणार्‍या विधानसभा निवडणुकांकडे पहाता ते असे बोलत नसतील, हे कशावरून ?