China Bunkers Penggong Lake : चीनने पेंगाँग सरोवराजवळ बांधले भूमीगत बंकर

लेह (लडाख) – चीनने लडाखमधील पेंगाँग सरोवराजवळ पक्‍के बांधकाम केले असून भूमीगत बंकरही बनवले आहेत. अमेरिकेच्‍या ‘ब्‍लॅकस्‍काय’ आस्‍थापनाच्‍या उपग्रहाने  काढलेल्‍या छायाचित्रांवरून ही माहिती समोर आली आहे. सैन्‍याची चिलखती वाहने आणि इतर गोष्‍टी यांसाठी पक्‍के बांधकाम केले आहे.

पेंगाँग सरोवराच्‍या उत्तरेकडील किनार्‍यावरील सिरजाप येथे चिनी सैन्‍याचा तळ आहे. सरोवराभोवती तैनात सैन्‍याचे हे मुख्‍यालय आहे. भारताने दावा केलेल्‍या भागातच हा तळ उभारण्‍यात आला आहे. प्रत्‍यक्ष नियंत्रणरेषेपासून याचे अंतर ५ किलोमीटर आहे. हा तळ गलवान खोर्‍याच्‍या दक्षिण-पूर्वेस १२० किलोमीटर अंतरावर आहे. याच गलवान खोर्‍यात वर्ष २०२० मध्‍ये भारत आणि चीन सैन्‍यात संघर्ष झाला होता. यात भारताचे २० सैनिक वीरगतीला प्राप्‍त झाले होते, तर चीनचे ४० सैनिक ठार झाले होते.

संपादकीय भूमिका

चीनला भारताशी युद्ध करण्‍याची खुमखुमी असल्‍याने तो अशा प्रकारची सिद्धता करत आहे. भारतही त्‍याला प्रत्‍युत्तर देण्‍यासाठी सिद्धता करत आहे. त्‍यामुळे भविष्‍यात युद्ध होणार, हे स्‍पष्‍ट असल्‍याने भारतियांनीही त्‍यासाठी सिद्ध राहिले पाहिजे !