‘वसिष्ठ’ या शब्दाचा अर्थ आणि त्यांचे कार्य !
वसिष्ठ अर्थात् सर्वांत प्रकाशवान, सर्वांत उत्कृष्ट, सर्वांमध्ये श्रेष्ठ आणि महिमावंत. महर्षि वसिष्ठ हे ब्रह्मदेवाच्या १० मानसपुत्रांपैकी एक आहेत. ते संत शिरोमणी, गुरु शिरोमणी, ज्ञान शिरोमणी आहेत. अध्यात्मात जेवढ्या काही पायर्या किंवा पदे आहेत, त्या सर्वांच्या शिखरावर गुरु वसिष्ठ विद्यमान आहेत. महर्षि वसिष्ठ हे ऋषींचे ऋषि आणि महर्षींचे महर्षि आहेत. ऋषि परंपरेचे सर्वाेच्च पद असलेल्या ‘ब्रह्मर्षि’ रूपात ते प्रतिष्ठित आहेत. वसिष्ठ महर्षि महातेजस्वी, त्रिकालदर्शी, पूर्णज्ञानी, महातपस्वी आणि योगी आहेत. ब्रह्मशक्तीचे मूर्तीमंत स्वरूप आहेत. मंत्र, तसेच यज्ञ विद्या यांचे जाणकार आहेत. ऋग्वेदाच्या सातव्या मंडलाचे अधिष्ठाता वसिष्ठ आहेत. या मंडलात वसिष्ठांद्वारे रचित अनेक सूक्ते आणि ऋचा आहेत. त्यात त्यांनी अग्नि, इंद्र, उषा, वरूण, मरूत्, सविता, सरस्वती आदि पूज्य देवी-देवतांची स्तुती मधुर आणि ओजस्वी वाणीने केली आहे. वसिष्ठांनी हिंदु धर्माची सांस्कृतिक परंपरा निर्माण केली. या आदर्श ब्रह्मर्षींचे भारतीय संस्कृतीवर प्रचंड ऋण आहे.
ब्रह्मदेवांनी वसिष्ठांना उत्पन्न केल्यानंतर त्यांना मृत्यूलोकात म्हणजे पृथ्वीलोकात जाऊन सृष्टीचा विस्तार करणे, तसेच सूर्यवंशाचे पौरोहित्य कर्म करणे याची आज्ञा दिली. त्या वेळी ब्रह्मदेवाने वसिष्ठांना सांगितले होते, ‘‘याच सूर्यवंशात पुढे जाऊन श्रीविष्णूचा मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम अवतार होणार आहे. हे पौरोहित्य कर्मच तुमच्या मुक्तीचा मार्ग होणार आहे.’’
सूर्यवंशाचे कुलगुरु वसिष्ठ !
वैवस्वताचा पुत्र इक्ष्वाकूच्या हाती मनूने सर्वांत प्रथम या पृथ्वीचे समृद्धशाली राज्य सोपवले होते. इक्ष्वाकू अयोध्येचा पहिला राजा होय ! इक्ष्वाकूने वसिष्ठांच्या उपदेशाने आपले वेगळे राज्य बनवले आणि अयोध्यापुरीला त्या राज्याची राजधानी बनवले. महर्षि वसिष्ठ हे इक्ष्वाकु वंशाच्या या सर्व राजांचे कुलपुरोहित होते.
प्रभु श्रीरामाचे नामकरण !
राजा दशरथाच्या घरी भगवंताचे अवतारधारण झाले. त्यानंतर भगवंताच्या या दिव्य मनोहर रूपाचे नामकरण करायचे होते. अखिल जगताचा पालक जेव्हा पृथ्वीतलावर अवतरला, तेव्हा त्याची कीर्ती कोणत्या नावाने करायची ? ते नावही अत्यंत महत्त्वपूर्ण असते. श्रीविष्णूच्या दिव्य अवताराच्या नामकरण संस्काराच्या वेळी भगवंताच्या या बालरूपाचे नामकरण करणारे महर्षि वसिष्ठच होते.
पुत्रांच्या नामकरण संस्काराच्या वेळी महर्षि वसिष्ठ म्हणतात, ‘‘कौसल्यानंदनाचे नाव केवळ २ अक्षरांचे आहे; परंतु त्या नावातच एवढे सामर्थ्य आहे की, अनंत ब्रह्मांडे त्यात सामावून जातील. अखिल विश्वाला आनंद देणार्या या सुखधामाचे नाव आहे ‘राम’ !’’ ‘रामसे बडा राम का नाम !’ असे आपण म्हणतो; परंतु हे दिव्य रामनाम ज्यांनी प्रभूंना प्रदान केले. त्यांच्या चरणी कृतज्ञता !
श्रीरामाने वसिष्ठांच्या आश्रमात जाऊन शिक्षण घेणे !
सूर्यवंशाचे राजगुरु असलेल्या महर्षि वसिष्ठांनी प्रभु श्रीरामांना राजपाट सांभाळण्याचे आणि वेदांचे शिक्षण दिले. सूर्यवंशी प्रभु श्रीराम महर्षि वसिष्ठांकडून अल्पकाळातच संपूर्ण विद्या ग्रहण केली. साक्षात् प्रभु श्रीराम शिष्याच्या रूपात लाभल्याने महर्षि वसिष्ठांचे जीवन सफल झाले. साक्षात् अवताराचे गुरु बनून त्याला घडवण्यासाठी भगवंताला महर्षि वसिष्ठांनाच माध्यम म्हणून निवडावे लागले, एवढे महान सामर्थ्य महर्षि वसिष्ठांमध्ये होते !
राजा दशरथाच्या मृत्यूनंतर सर्वांना आधार देणे !
राजा दशरथाच्या मृत्यूनंतर आणि श्रीराम वनवासात गेल्यावर भरतासह संपूर्ण प्रजेला आधार देणारे एकमात्र महर्षि वसिष्ठ होते !
महर्षि वसिष्ठांनी इतिहासातील अनेक प्रसंग सर्वांना सांगितले. त्या अपार ज्ञानाच्या तेजाने सर्वांचा शोक नाहीसा केला. सर्वांना धीर दिला. राजदरबारात भरताला धर्ममय उपदेश केला, ‘‘भरता, जीवनात लाभ-हानी, जीवन-मरण आणि यश-अपयश या गोष्टी केवळ विधात्याच्याच हाती असतात. त्यामुळे या गोष्टींसाठी कुणालाही दोष देणे व्यर्थ असते.’’ या निमित्ताने महर्षि वसिष्ठांनी अखिल मानवजातीलाच जीवनाचे शाश्वत सूत्र दिले आहे !
भरताच्या काळातही १४ वर्षे जनतेने रामराज्यच अनुभवले. त्यामागे महर्षि वसिष्ठांचे मोठे योगदान आहे ! महर्षि वसिष्ठ म्हणजे रामराज्याचा भव्यदिव्य, भरभक्कम असा आधारस्तंभच होते. साक्षात् श्रीरामांचे गुरु आणि रघुवंशाचे कुलगुरु, राजगुरु बनून पिढ्यान्पिढ्या दिशादर्शन करणारे वसिष्ठ हे ऋषिश्रेष्ठ आहेत !
(संदर्भ : भक्तीसत्संग, सनातन संस्था)
प्रभु श्रीरामांच्या अवतारी कार्यात महर्षि वसिष्ठांचे योगदान !त्रेतायुगामध्ये जेव्हा पृथ्वीतलावर सर्वत्र अधर्म माजला, तेव्हा अवतारधारणाच्या कार्यात महर्षि वसिष्ठांचे अमूल्य असे योगदान आहे. वसिष्ठ म्हणजे साक्षात् श्रीविष्णूंचे अवतार असलेल्या श्रीरामप्रभूंचे गुरु ! श्रीरामप्रभूंचे जीवनचरित्र महर्षि वसिष्ठांच्या उल्लेखाविना पूर्ण होऊच शकत नाही. वसिष्ठांनी प्रभु श्रीरामांच्या अवतारत्वाविषयी जगताला ओळख करून दिली. वेळोवेळी श्रीरामावताराची कीर्ती केली. त्यामुळे श्रीरामावताराचे माहात्म्य सर्वांना कळू शकले. रामायणातील प्रत्येक घटना महर्षि वसिष्ठांविना पूर्ण होऊ शकत नाही. रामायणातील प्रत्येक प्रसंगाला महर्षि वसिष्ठांच्या दिव्यत्वाचा स्पर्श झालेला आहे. त्यांचे कार्यच एवढे थोर आणि महत्त्वपूर्ण आहे. वसिष्ठांनी स्वत:चे ज्ञान आणि पुण्य यांच्या साहाय्याने रघुवंशाला थोरपण प्राप्त करून दिले. महर्षि वसिष्ठांनी दशरथाला पुत्रप्राप्तीसाठी ‘पुत्रकामेष्टी याग’ करण्यास सांगितले. वनवास पूर्ण करून प्रभु श्रीरामचंद्र जेव्हा अयोध्येला परतल्यावर श्रीरामप्रभूंचा राज्याभिषेक करणारे महर्षि वसिष्ठच होते. गुरु वसिष्ठांनी अनेक प्रसंगामध्ये आणि अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांमध्ये श्रीरामांना मार्गदर्शन केले. त्यांनी श्रीरामांकडून विश्वकल्याणार्थ अनेक यज्ञही करवून घेतले. अनेक वेळा आपत्कालीन प्रसंगात त्यांनी प्रजेचे रक्षण केले. त्यांच्या योगदानामुळे रामराज्याची स्थापना होऊ शकली. अशा प्रकारे रामराज्याच्या स्थापनेमध्ये महत्त्वपूर्ण वाटा असलेल्या महर्षि वसिष्ठांच्या चरणी कोटी कोटी नमन ! (संदर्भ : भक्तीसत्संग, सनातन संस्था) |