IMA Chief Apologizes : ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’चे अध्यक्ष डॉ. अशोकन् यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयाची क्षमायाचना !

  • पतंजलीच्या उत्पादनांविषयी सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवर केली होती टीका !

  • सर्वोच्च न्यायालयाने इंडियन मेडिकल असोसिएशनला फटकारले होते !

‘आय.एम्.ए.’चे अध्यक्ष डॉ. आर्. व्ही. अशोकन्

नवी देहली – इंडियन मेडिकल असोसिएशनचे (‘आय.एम्.ए.’चे) अध्यक्ष डॉ. आर्. व्ही. अशोकन् यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात केलेल्या वक्तव्याविषयी जाहीर क्षमायाचना केली आहे. याविषयी आय.एम्.ए.ने प्रसिद्धीपत्रक काढले आहे. ‘सर्वोच्च न्यायालयाची प्रतिष्ठा न्यून करण्याचा डॉ. अशोकन् यांचा कधीही हेतू नव्हता’, असेही या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

काय आहे प्रकरण ?

‘पतंजलि आयुर्वेद लिमिटेड’ने त्याच्या उत्पादनांविषयी कथित दिशाभूल करणारी विज्ञापने प्रसारित केल्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. याचिका प्रविष्ट करणार्‍यांमध्ये ‘आय.एम्.ए.’चाही समावेश होता. या खटल्याच्या सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने, ‘आय.एम्.ए.नेही स्वतःचे घर ‘ठीक’ करणे आवश्यक आहे’, अशी टिपणी केली होती. त्या वेळी न्यायालयाने खासगी डॉक्टर्स करत असलेल्या अनैतिक कृत्यांविषयी भाष्य केले होते. यावर पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये डॉ. अशोकन् यांनी सर्वोच्च न्यायालयाने खासगी डॉक्टरांविषयी घेतलेल्या भूमिकेविषयी अप्रसन्नता करत ‘न्यायालयाने घेतलेली भूमिका त्याच्या प्रतिष्ठेला साजेशी नाही’, असे म्हटले होते.

सर्वोच्च न्यायालयाने फटकारले !

या मुलाखतीची नोंद घेत सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीच्या वेळी म्हटले होते की, ‘आम्ही तुमच्याकडून दायित्वाने वागण्याची अपेक्षा करतो. तुम्हाला न्यायालयाविषयी जे वाटते, ते तुम्ही अशा प्रकारे वृत्तसंस्थेसमोर जाऊन व्यक्त करू शकत नाही. तुम्ही अचानक अशी कृती का केली ?’. त्यावर डॉ. अशोकन् यांनी प्रतिज्ञापत्र सादर करून न्यायालयाची क्षमा मागितली होती; मात्र न्यायालयाने ती स्वीकारण्यास नकार दिला होता. त्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने डॉ. अशोकन् यांना जाहीर क्षमा मागण्यास सांगितले होते. त्यानंतर डॉ. अशोकन् यांनी जाहीर क्षमा मागितली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने खासगी डॉक्टरांवर केली होती टीका !

सर्वोच्च न्यायालयाने त्या वेळी म्हटले होते, ‘असोसिएशनचे सदस्य (डॉक्टर्स) करत असलेल्या अनैतिक कृत्यांशी संबंधित अनेक तक्रारी आहेत. यामुळे रुग्णांचा त्यांच्यावरील विश्‍वास ढळत आहे. डॉक्टर्स रुग्णांना केवळ महागडी औषधे लिहून देत नाहीत, तर टाळता येण्याजोग्या चाचण्या करण्याचीही शिफारस करतात. (यावर सरकार किंवा आय.एम्.ए. काहीही करणार नाही, त्यामुळे न्यायालयानेच अशा डॉक्टरांविरुद्ध कठोर कारवाई करून त्यांचे प्रमाणपत्रच रहित केले पाहिजे. तरच जनतेची होणारी पिळवणूक थांबेल ! – संपादक)

संपादकीय भूमिका

दिशाभूल करणारी विज्ञापने प्रसारित केल्याच्या प्रकरणात बाबा रामदेव यांना सर्वोच्च न्यायालयाने माफी मागण्यास सांगितल्यावर अनेक प्रसारमाध्यमांनी याविषयीची वृत्ते तिखट-मीठ लावून प्रसारित केली होती; मात्र याच प्रकरणात पक्षकार असलेल्या आय.एम्.ए.च्या अध्यक्षांनाही सर्वोच्च न्यायालयाने सुनावले होते आणि त्यांना क्षमा मागण्यास सांगितले होते. ही वृत्ते मात्र दाबली गेली होती. यावरून प्रसारमाध्यमांमध्ये हिंदुविरोधी यंत्रणा कशी कार्यरत आहे, हे दिसून येते !