Ganga Water Level : गंगा नदीचा काठ कोरडा !

  • गंगा नदीची दयनीय स्थिती !

  • धरणांमुळे गंगा नदीतील पाणी अल्प झाल्याचा परिणाम !

वाराणसी (उत्तरप्रदेश) – गंगा नदीने तिचा किनारा सोडला आहे. गेल्या वर्षीच्या जूनच्या तुलनेत या वेळी गंगा नदी अनुमाने १५ फूट खाली गेली आहे. गंगा नदीच्या मध्यभागासह गंगेच्या काठाचेही वाळूच्या किनार्‍यात रूपांतर होत आहे. हे सर्व पाहिल्यानंतर यावर विश्‍वास बसत नाही, असे या संदर्भातील शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

१. गंगा नदीच्या वस्ती असणार्‍या घाटांवर रेती आणि गाळ साचत असल्याचे प्रथमच दिसून आले आहे. वाराणसीतील गंगा नदीच्या ४० हून अधिक घाटांवर ही स्थिती निर्माण झाली आहे. सिंधिया घाट, सक्का घाट, ललिता घाट ते दशाश्‍वमेध घाट आणि पांडे घाट येथपर्यंत वाळू अन् गाळ पोचला आहे. अस्सी घाट आधीच वाळू आणि माती यांनी  व्यापलेला आहे. दशाश्‍वमेध घाटावर अधिकाधिक वाळू आणि माती जमा होते. येथे येणारे पर्यटक आणि भाविक घाटाच्या पायर्‍या उतरतात अन् वाळू आणि माती यांवर उभे राहून छायाचित्रे काढतात.

२. नौकाविहार करणार्‍यांनाही रेती ओलांडून जावे लागते. दशाश्‍वमेध घाटासमोर दीड किलोमीटर रुंद वाळूचा ढीग जमा झाला आहे. गाय घाट ते राजघाट यामध्ये २ किलोमीटर रुंद वाळूचा ढीग निर्माण झाला आहे. घाटासमोर गंगेच्या मधोमध वाळूचे लांबलचक पट्टे निर्माण झाले आहेत. येथे पाण्याची उपलब्धता कमालीची घटली आहे.

३. ‘गंगा नदीचा अखंड प्रवाह थांबवण्यात आल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे’, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. धरणांमुळे गंगा नदीची हानी होत आहे, तसेच गंगा नदी स्वच्छ करण्याचा सरकारचा प्रयत्न अयशस्वी ठरत आहे.

४. बनारस हिंदु विश्‍वविद्यालयाच्या गंगा संशोधन केंद्रातील प्रा. डॉ. बी.डी. त्रिपाठी म्हणाले की, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बांधला गेला असून सर्व कामे चालू आहेत; परंतु गंगा नदीच्या पाण्याची पातळी न्यून झाली आहे. गंगा नदीत पाणी नसल्याने नाल्यांमधील सांडपाणी त्यात पडत आहे. त्यामुळे येथील प्रदूषण वाढत आहे.

संपादकीय भूमिका

  • ‘गंगा नदीची झालेली दयनीय स्थिती आत्पकाळाचा आरंभ आहे’, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये !
  • गंगा नदीला ‘देवनदी’ असे संबोधले जाते ! मोठे अध्यात्मिक महत्त्व असलेल्या या नदीची दयनीय अवस्था होणे, हे सरकारी यंत्रणा आणि हिंदू यांना लज्जास्पद !