US Bill : अमेरिकेने चीनचा तिबेटवरील दावा फेटाळला !

अमेरिकेच्या संसदेत तिबेटशी संबंधित विधेयक संमत !

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या संसदेत तिबेटशी संबंधित एक विधेयक संमत करण्यात आले आहे. या कायद्यानुसार तिबेटविषयी चीनने जगभरात पसरवलेल्या खोट्या गोष्टींना अमेरिका उत्तर देईल. याखेरीज चीन आणि दलाई लामा यांच्यात बिनशर्त करार करण्यासाठीही ते प्रयत्न करणार आहेत. तिबेट हा स्वतःचा हिस्सा असल्याचा चीनचा दावाही अमेरिकेने फेटाळून लावला आहे. अमेरिकन संसदेच्या दोन्ही सभागृहांत (प्रतिनिधी सभागृह आणि सिनेट) हे विधेयक संमत करण्यात आले.

या कायद्याच्या कार्यवाहीनंतर (अंमलबजावणीनंतर) १८ जून या दिवशी अमेरिकेच्या संसदेच्या माजी अध्यक्षा नॅन्सी पेलोसी आणि रिपब्लिकन पक्षाचे खासदार मायकल मॅकॉल हे दोघे दलाई लामा यांची भेट घेण्यासाठी भारतात येणार आहेत. चीनने वर्ष १९५० मध्ये तिबेटवर आक्रमण करून ते कह्यात घेतले होते.

काय आहे चीन-तिबेट वाद !

चीन आणि तिबेट यांच्यामधील वाद फार जुना आहे. चीन म्हणतो की, तिबेट तेराव्या शतकात चीनचा भाग होता, त्यामुळे तिबेटवर त्याचा अधिकार आहे. चीनचा हा दावा तिबेटने फेटाळला आहे. वर्ष १९१२ मध्ये तिबेटचे १३ वे धर्मगुरू दलाई लामा यांनी तिबेटला स्वतंत्र घोषित केले. चीनमधील कम्युनिस्ट सरकारच्या विस्तारवादी धोरणांमुळे वर्ष १९५० मध्ये चीनने सहस्रो सैनिकांसह तिबेटवर आक्रमण केले. वर्ष १९५१ मध्ये  तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांनी १७ कलमी करारावर स्वाक्षरी केली. या करारानंतर तिबेट अधिकृतपणे चीनचा भाग बनला; मात्र दलाई लामा यांना हा करार मान्य नाही. दबावाखाली हा करार करण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मार्च १९५९ मध्ये चीन दलाई लामा यांना ओलीस ठेवणार असल्याची बातमी पसरली. यानंतर दलाई लामा तिबेटची राजधानी ल्हासा येथून निसटले आणि सैनिकाच्या वेशात भारतात पोचले. दलाई लामा अजूनही भारतात रहातात.