रत्नागिरी येथील सनातनचे साधक प्रमोद भडकमकर एस्.आर्.टी. कृषी सन्मान विशेष पुरस्काराने सन्मानित

आमदार डॉ. मनीषा कायंदे यांच्याकडून पुरस्कार स्वीकारतांना श्री. प्रमोद भडकमकर

रत्नागिरी, २६ मे (वार्ता.) – तालुक्यातील पोमेंडी खुर्द येथील श्री. प्रमोद कृष्णा भडकमकर आणि श्री. रमेश शंकर भडकमकर यांना एस्.आर्.टी. (एस्.आर्.टी.म्हणजे शून्य मशागत शेती तंत्र) कृषी सन्मान विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्वातंत्र्यसैनिक हरिकाका भडसावळे जयंतीनिमित्त एस्.आर्.टी. शेतकरी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात त्यांना सन्मानित करण्यात आले. मागील १० वर्षे सातत्याने एस्.आर्.टी. पद्धतीने भडकमकर कुटुंबीय लागवड करतात. भातासह नाचणी, वरी, पावटे, कुळीथ आदी पिके ते घेत आहेत. या पद्धतीमुळे जमिनीची धूप थांबते आणि सुपीकताही वाढते.

श्री. भडकमकर यांचा अनुभव समाधानकारक असून श्रम आणि खर्च यांची बचत होते. मिळणारे पिक सकस आणि चांगल्या प्रतीचे (खात्रीलायक) असते. याचा विचार करून एस्.आर्.टी. शून्य मशागत पद्धतीने शेती करणार्‍या शेतकर्‍यांना विशेष कृषी सन्मान पुरस्कार दिला जातो. हा कार्यक्रम रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे झाला. या कार्यक्रमात सनातनचे साधक श्री. प्रमोद कृष्णा भडकमकर यांना सन्मानपत्र, ५ सहस्र रोख, दीड सहस्र रुपये प्रवासभत्ता देऊन गौरवण्यात आले. या वेळी संस्थेचे संस्थापक कृषीभूषण चंद्रशेखर भडसावळे, राजीव खांडेकर, विधान परिषद सदस्या आमदार डॉ. मनीषा कायंदे उपस्थित होत्या.