Corona Virus : सिंगापूरनंतर भारतातही कोरोनाच्या ‘केपी १’ आणि ‘केपी २’ च्या प्रकारांचे आढळले रुग्ण

प्रतिकात्मक चित्र

नवी देहली – भारतात पुन्हा एकदा कोविड-१९ ची ३२४ प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. महत्त्वाचे म्हणजे यामध्ये ‘केपी २’ची २९० प्रकरणे आणि ‘केपी १’ची ३४ प्रकरणे आहेत. या दोन्ही प्रकारांचा सिंगापूरमध्ये मोठा संसर्ग झाला आहे. या प्रकारामुळेच जग पुन्हा चिंतेत आहे. भारतात सध्या रुग्णालयात भरती होणार्‍या रुग्णांची संख्या अल्प आहे. घाबरण्याची आवश्यकता नाही. या प्रकाराशी संबंधित कोणतीही गंभीर प्रकरणे आढळलेली नाहीत; पण काळजी घेण्याची आवश्यकता आहे; कारण हा प्रकार फार वेगाने पसरतो. भारतात सध्या केपी १ चे उत्तराखंडमध्ये १, हरियाणामध्ये ४, राजस्थानमध्ये २, बंगालमध्ये २३, गुजरातमध्ये २ आणि गोव्यात १ रुग्ण आढळला आहे.

‘केपी २’ रुग्णांची संख्या अत्यधिक आहे. याचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. महाराष्ट्रात आढळलेल्या रुग्णांची संख्या १४८ आहे, तर बंगालमध्ये ३६ रुग्ण आहेत. या रुग्णांना तापामुळे थंडी वाजून येणे किंवा फक्त ताप येणे, सतत खोकला, घसा खवखवणे, डोकेदुखी, स्नायू दुखणे, श्‍वास घेण्यात अडचण, थकवा, कशाचीही चव किंवा वास नाही, पोटदुखी, सौम्य अतिसार, उलट्या आदी लक्षणे दिसून येतात.