Waiting for Shiva Book Launched : ज्ञानवापीतील शिवलिंग प्राप्त करण्यासाठी आम्ही १ इंच भूमीचीही तडजोड करणार नाही !

  • सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांचे रोखठोक वक्तव्य !

  • सुप्रसिद्ध लेखक विक्रम संपत यांच्या ‘प्रतीक्षा शिवाची : काशी-ज्ञानवापीच्या सत्याचा शोध’ या पुस्तकाचे प्रकाशन !

डावीकडून वैदेही जोशी, डॉ. प्राची जांभेकर, सुधीर जोगळेकर, अधिवक्ता विष्णु शंकर जैन, विक्रम संपत

मुंबई, १९ मे (वार्ता.) – काशीमधील ज्ञानवापी शिवलिंग हे हिंदूंचे आराध्य आहे. ज्ञानवापी शिवलिंग आम्ही पुरुषार्थाने मिळवू. अयोध्येत श्रीरामजन्मभूमी दिली; म्हणून आम्ही ज्ञानवापी शिवलिंगासाठी तडजोड करणार नाही. केवळ ज्ञानवापी शिवलिंग नव्हे, तर जेथे-जेथे मंदिरे पाडून मशिदी उभारण्यात आल्या आहेत, ती सर्व मंदिरे आम्ही पुन्हा मिळवू. तलवारीपेक्षा लेखणीचे बळ अधिक आहे. ज्ञानवापी शिवलिंग प्राप्त करण्यासाठी आम्ही १ इंच भूमीचीही तडजोड करणार नाही, अशी समस्त धर्माभिमानी हिंदूंच्या मनातील भावना ज्ञानवापी शिवलिंगासाठी हिंदूंच्या वतीने खटला लढवणारे सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी व्यक्त केली.

सुप्रसिद्ध हिंदुत्वनिष्ठ लेखक विक्रम संपत यांच्या ‘वेटिंग फॉर शिवा : अनअर्थिंग द ट्रुथ ऑफ काशीस ज्ञानवापी’ या इंग्रजी पुस्तकाच्या ‘प्रतीक्षा शिवाची : काशी-ज्ञानवापीच्या सत्याचा शोध’ या मराठी अनुवादित पुस्तकाचे १८ मे या दिवशी प्रकाशन झाले. या सोहळ्यात ते बोलत होते. दादर (पूर्व) येथील राजा शिवाजी विद्यासंकुलामध्ये हा कार्यक्रम पार पडला.

या वेळी व्यासपिठावर पुस्तकाचे लेखक श्री. विक्रम संपत, पुस्तकाच्या मराठी अनुवादक डॉ. प्राची जांभेकर आणि कु. मैत्रेयी जोशी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक श्री. सुधीर जोगळेकर यांनी भूषवले. या वेळी डॉ. प्राची जांभेकर यांनी श्री. विक्रम संपत आणि अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांची मुलाखत घेतली. अधिवक्ता जैन म्हणाले, ‘‘ज्ञानवापी शिवलिंग मी स्वत: पाहिले आहे. हे शिवलिंग खंडित करून त्यावर सिमेंटचे बांधकाम करून त्याला कारंज्याचे रूप देण्यात आले आहे; परंतु शिवलिंग आणि त्यावरील सिमेंटचे बांधकाम वेगळे दिसते. वैज्ञानिक चाचणी केल्यावर हे सत्य उघड होईल. याविषयीचा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. काही हिंदू ‘हे शिवलिंग खंडित झाल्यामुळे त्याची पूजा करता येणार नाही’, असा तर्क लढवतात; मात्र काशीस्थानाच्या ५ कोसांच्या क्षेत्रात खंडित शिवलिंगाचीही पूजा करण्याला धर्ममान्यता आहे. ज्ञानवापी शिवलिंगाप्रती आमच्या धार्मिक भावना आहेत. हा खटला म्हणजे आमच्यासाठी भक्तीचा मार्ग आहे. भगवान शिवाप्रती असलेल्या पवित्र भावाने आम्ही हा खटला लढवत आहोत.’’

काशी विश्‍वेश्‍वराचे मंदिर पाडण्याच्या खोट्या कथा सिद्ध करण्यात आल्या ! – सुप्रसिद्ध लेखक विक्रम संपत

सुप्रसिद्ध लेखक विक्रम संपत

काँग्रेसच्या काळात काशी विश्‍वेश्‍वर मंदिर पाडण्याच्या संदर्भहीन खोट्या कथा सिद्ध करण्यात आल्या. राजपूत राजांच्या राण्यांवर काशी विश्‍वेश्‍वर मंदिरातील पुजार्‍यांनी बलात्कार केल्यामुळे राजपूत राज्याच्या आग्रहास्तव औरंगजेबाने मंदिर पाडल्याची खोटी कथा प्रचलित करण्यात आली. वारंवार खोटे सांगितल्याने ते खरे वाटायला लागते.

राजपूतांच्या सांगण्यावरून औरंगजेबाने काशी विश्‍वेश्‍वर मंदिर पाडले असेल, तर सोमनाथ, मथुरा येथील मंदिरे कुणाच्या सांगण्यावरून पाडली ? औरंगजेबाने कबरीतून बाहेर येऊन ‘काशी विश्‍वेश्‍वराचे मंदिर का पाडले ?’, हे सांगितले, तरी भ्रमित हिंदू त्यावर विश्‍वास ठेवणार नाहीत. या पुस्तकातून काशी विश्‍वेश्‍वर आणि ज्ञानवापी शिवलिंग यांविषयीचा सत्य इतिहास सर्वांपुढे येईल.