पृथ्वीवर झाले गंगेचे अवतरण, मनोभावे करूया गंगापूजन ।

आज १४ मे २०२४ या दिवशी ‘गंगोत्पत्ती आणि गंगापूजन’ आहे. त्या निमित्ताने कु. मधुरा भोसले यांना सुचलेले काव्य येथे देत आहोत.

सुश्री (कु.) मधुरा भोसले

‘विष्णुपदी’ असे भाग्यवान । श्रीचरणी लाभले गंगेला स्थान ।
गंगानदीची कथा महान । ऋषीमुनींनी केले तिचे गुणगान ।। १ ।।

सगरपुत्रांना झाला अभिमान । त्यांनी केला कपिलमुनींचा अपमान ।
मुनींनी सोडला शापबाण । क्षणात झाले सारे पाषाण ।। २ ।।

पितरांचे करण्या पुनरुत्थान । भगीरथाने आरंभले तप-अनुष्ठान ।
भगीरथाची भक्ती महान । शिव प्रगटले त्यजून ध्यान ।। ३ ।।

प्रसन्न होऊन दिले वरदान । शिवाने केले गंगेचे आवाहन ।
‘गंगेने करावे शीघ्र प्रस्थान’। शिवाज्ञेने हरपले गंगेचे भान ।। ४ ।।

‘प्रभुचरण असे मम जीवन प्राण । तयाविण मी होईन निष्प्राण’ ।
‘जाऊ कशी हरिचरण सोडून, थांबू कशी शिवाज्ञा मोडून’।। ५ ।।

डोळ्यांत अश्रू रोखून । मनात श्रीरूप साठवून ।
श्रीहरीचा निरोप घेऊन । गंगा गेली वैकुंठ सोडून ।। ६ ।।

तारक सौम्य रूप सोडून । उग्ररूप धारण करून ।
अधोगामी प्रवाहित होऊन । गंगा आली मर्यादा ओलांडून ।। ७ ।।

प्रचंड वेगाने झाली गतीमान । शिवाने जाणला तिचा अभिमान ।
गंगेला दिले जटेमध्ये स्थान । जटेत केले तिला बंदिवान ।। ८ ।।

गंगेने केले श्रीविष्णूचे ध्यान । धावत आले श्रीविष्णु भगवान ।
विष्णु वदले ‘गंगेस द्यावे क्षमादान । शिवाने पूर्ण करावे वरदान’ ।। ९ ।।

गंगेवर कृपाळू होऊन । मुक्त केले शिवाने जटाबंधातून ।
आनंद वाहू लागला ओसंडून । गंगा प्रगटली शिवजटेतून ।। १० ।।

पृथ्वीवर गंगा अवतरली । सारी सृष्टी पुलकित झाली ।
देवांनी पुष्पवृष्टी केली । गंगेचे पूजन आणि आरती झाली ।। ११ ।।

शिवशंभो दयावान । गंगानदी कृपानिधान ।
नंदीने केले स्तुतीगान । ‘गंगाधर’ झाले शिवशंकर भगवान ।। १२ ।।

पृथ्वीचे भाग्य महान । गंगेने केले अनेक जिवांचे कल्याण ।
तिने राखला भगीरथाचा मान । त्याच्या पितरांना दिले मुक्तीदान ।। १३ ।।

वैकुंठाचे मूळ स्थान । शिवजटेचे निवासस्थान ।
गंगोत्रीचे उगमस्थान । हिमालयाचे जन्मस्थान ।। १४ ।।

तिचे पिता पर्वतराज हिमवान । ती राजा शंतनूची भार्या गुणवान ।
तिने दिले अष्टवसूंना (टीप १) मुक्तीचे दान । गंगेचे जीवन दैदीप्यमान ।। १५ ।।

दिव्यकांती रविसमान । मंजुळ वाणी वीणेसमान ।
कोमल काया फुलासमान । सात्त्विक सौंदर्य शारदेसमान ।। १६ ।।

जो करतो गंगेत पवित्र स्नान । त्यास देते गंगा मोक्ष-मुक्ती दान ।
गंगेचा त्याग किती महान । तिने केले विश्वकल्याण ।। १७ ।।

गंधर्वांची स्वरगंगा । हिमवानची हेमगंगा ।
हिरण्यमय कांचनगंगा । वात्सल्यमय प्रेमगंगा ।। १८ ।।

मुक्तीदायिनी ज्ञानगंगा । मोक्षदायिनी भक्तीगंगा ।
प्राणदायिनी जीवनगंगा । आनंददायिनी भावगंगा ।। १९ ।।

जान्हवी (टीप २) पापमोचनी, पतितपावन मंदाकिनी ।
भागीरथी विश्वजननी । गंगानदी त्रिपथ गामिनी ।। २० ।।

हे गंगे, तू पुण्यवर्धिनी आणि पाप विनाशिनी ।
हे गंगामाते, तुला वंदन करते माझे दोन्ही कर जोडूनी ।। २१ ।।

टीप १ – अष्टवसु (देवकूळ) : आप, ध्रुव, सोम, धर्म, अनिल, अनल, प्रत्युष आणि प्रभास (संदर्भ : भक्तीकोष)

टीप २ – जान्हवी किंवा जन्हु नंदिनी : राजा भगीरथाचे अनुगमन करत जेव्हा गंगानदी वाहू लागली, तेव्हा वाटेमध्ये ‘जन्हु’ऋषींचा आश्रम लागतो. त्यांचे दर्शन घेण्यासाठी राजा भगीरथ तेथे काही वेळ थांबतो; परंतु गंगानदीला तिच्या प्रवाहाचा वेग थांबवता येत नाही. त्यामुळे तिच्या प्रवाहाने जन्हुऋषींचे यज्ञकुंड आणि यज्ञशाला वाहून जातात. त्यामुळे जन्हुऋषि क्रोधित होऊन गंगानदीला पिऊन टाकतात. त्यानंतर गंगानदीने त्यांची क्षमायाचना केल्यावर जन्हुऋषि त्यांच्या कानातून गंगानदीचा प्रवाह प्रगट करतात आणि गंगानदी पुन्हा धरणीवर वाहू लागते. त्यामुळे एकप्रकारे गंगानदी ही जन्हुऋषींची कन्या झाल्यामुळे तिला ‘जन्हु नंदिनी’ किंवा ‘जान्हवी’ या नावाने संबोधले जाते.

– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.४.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक