डेहराडून (उत्तराखंड) – उत्तराखंड राज्यातील चार धाम यात्रेला १० मे पासून प्रारंभ झाला. सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे त्यांच्या पत्नीसह केदारनाथाच्या दर्शनासाठी पोचले. केदारनाथ व्यतिरिक्त गंगोत्री आणि यमुनोत्री मंदिरांचेही दरवाजे उघडण्यात येणार आहेत. १२ मे पासून बद्रीनाथ मंदिरात दर्शनाला प्रारंभ होणार आहे. या ठिकाणी दिवसाचे तापमान शून्य ते ३ अंश सेल्सियस नोंदवले जाते. चार धाम यात्रेसाठी आतापर्यंत २२ लाख १५ सहस्रांहून अधिक भाविकांनी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षी ५५ लाख लोकांनी चार धामला भेट दिली होती. यावर्षी प्रथमच भाविकांची संख्या मर्यादित ठेवण्यात आली असून प्रतिदिन केवळ १५ सहस्र भक्त केदारनाथला भेट देऊ शकतील.