GOA OCI Card Issue : ‘ओ.सी.आय्.’ कार्डसाठी आता भारतीय पारपत्र समर्पण केल्याचे  प्रमाणपत्र पुरेसे

केंद्र सरकारने गोव्याची मागणी केली मान्य

(‘ओ.सी.आय्.’ म्हणजे ओव्हरसीज सिटीझनशिप ऑफ इंडिया, ज्याद्वारे भारतीय वंशाच्या परदेशी नागरिकाला अनिश्चित काळासाठी भारतात रहाण्यासाठी आणि काम करण्यासाठी अधिकृत अनुमती मिळते.)

पणजी, २१ एप्रिल (वार्ता.) : पारपत्र समर्पण केल्यानंतर ‘ओ.सी.आय्.’ कार्ड मिळण्यासाठी गोमंतकियांना अडचणी येत होत्या. गोवा सरकारने केलेल्या मागणीवरून केंद्राने यावर आता तोडगा काढला आहे. ‘ओ.सी.आय्.’ कार्ड मिळवण्यासाठी आता पर्यायी कागदपत्र (दस्तऐवज) म्हणून पारपत्र समर्पण केल्याचे प्रमाणपत्र पुरेसे ठरणार आहे, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. यामुळे पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारलेल्या गोमंतकियांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत मंत्री आलेक्स सिक्वेरा यांच्यासह फेब्रुवारी मासात देहली येथे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांना भेटून त्यांच्याकडे ‘ओ.सी.आय्.’ कार्डसंबंधी गोमंतकियांचा प्रश्न सोडवण्याची मागणी केली होती. याला यश आले आहे.

केंद्राच्या निर्णयाचा सहस्रो गोमंतकीय आणि त्यांचे कुटुंबीय यांना लाभ मिळणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

याविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘ओ.सी.आय्.’ कार्ड मिळवण्यासाठी आता पर्यायी कागदपत्र म्हणून पारपत्र समर्पण केल्याचे प्रमाणपत्र पुरेसे असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. याचा सहस्रो गोमंतकीय आणि त्यांचे कुटुंबीय यांना लाभ मिळणार आहे. गोवा सरकारची मागणी मान्य केल्याने आम्ही केंद्रशासनाचे आभार मानतो.’’

राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे यांनी राज्यसभेत एका लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून पोर्तुगालात जन्मनोंदणी झाली; म्हणून भारतीय पारपत्र परराष्ट्र मंत्रालयाने रहित करू नये, अशी मागणी केली होती.

दक्षिण गोव्याचे काँग्रेसचे मावळते खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनीही यावर लोकसभेत आवाज उठवला होता.

काय आहे ‘ओ.सी.आय.’ प्रश्न ?

‘ओ.सी.आय्.’ कार्ड मिळवण्यासाठी पारपत्र समर्पण केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असते. ३० नोव्हेंबर २०२२ मध्ये परराष्ट्र मंत्रालयाच्या आदेशावरून पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारलेल्या गोमंतकियांचे पारपत्र रहित करण्यास प्रारंभ झाला. विदेशी नागरिकत्व स्वीकारल्याविषयी माहिती लपवून ठेवल्याने पारपत्र रहित करण्यात येऊ लागले. यामुळे पारपत्र देणार्‍या कार्यालयाने पारपत्र रहित झालेल्या गोमंतकियांना पारपत्र समर्पण प्रमाणपत्र देणे बंद केले आणि यामुळे हे नागरिक ‘ओ.सी.आय्.’ कार्ड घेण्यापासून वंचित राहिले.