मी गुजरात राज्यातील जामनगर येथील ‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ या आस्थापनात ‘व्यवस्थापक’ या पदावर काम करत होतो. मी आणि माझे कुटुंब जामनगर येथे रहात होतो. वर्ष २०२० मध्ये माझी ‘ऑनलाईन’च्या माध्यमातून कुवेत या देशात नोकरीसाठी निवड झाली. त्यासाठी मी एकटाच कुवेतला जाणार होतो; म्हणून मी मार्च २०२० मध्ये पत्नी आणि मुले यांच्यासमवेत जामनगर सोडून गुजरातमधील ‘सिल्वासा’ या ठिकाणी आमच्या स्वतःच्या सदनिकेत रहायला गेलो. तेथे गेल्यानंतर काही दिवसांतच कोरोना महामारीमुळे दळणवळण बंदीला आरंभ झाला. त्या वेळी विमानसेवाही बंद असल्यामुळे मला कुवेतला जाता येत नव्हते. मला नोकरी नसल्याने मी घरीच रहात होतो. अशा कालावधीत आम्ही सर्वजण प्रतिदिन भावपूर्ण नामजप करायचो. तेव्हा मला पुढील अनुभूती आल्या.
१. कोरोना महामारीच्या काळात पूर्वी प्रयत्न करूनही साधना न करणार्या नातेवाइकांनी गुरुदेवांच्या संकल्पामुळे साधनेस आरंभ करणे आणि साधकाच्या घरी नियमित सत्संग चालू होणे
घरी असतांना एकदा मला एका साधिकेचा दूरध्वनी आला. त्यांनी सांगितले, ‘आपल्या नातेवाइकांना साधना सांगा, म्हणजे ते सर्वजण साधना करतील. गुरुदेव सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा तसा संकल्प झाला आहे.’ तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘गेली अनेक वर्षे मी माझे आई-वडील, बहीण यांना साधना सांगण्याचा प्रयत्न करत आहे; परंतु ते मला म्हणतात, ‘‘तू तुझे करत जा.’’ ते सर्वजण शेतातील कामे करतात. मी विचार केला ‘गुरुदेवांचा संकल्प आहे, तर आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे ?’ आश्चर्य, म्हणजे तसा प्रयत्न केल्यावर ते नामजप करू लागले आणि सनातन संस्थेचा एक सत्संग आमच्या घरामध्ये चालू झाला. त्या सत्संगात २१ जण उपस्थित रहायचे. आजसुद्धा प्रतिदिन ते सर्वजण नामजप करतात आणि गुरुदेवांना प्रार्थना करतात. तेव्हा ‘गुरुदेवांचा संकल्प कार्य कसा करतो ?’, हे मला शिकायला मिळाले.
२. कोरोना महामारीच्या काळात आर्थिक अडचणी येणे आणि सूक्ष्मातून गुरुदेवांनी पूर्वी काम केलेल्या आस्थापनात काम मिळणार असल्याचे सांगितल्यावर प्रत्यक्षातही तसेच घडणे
नोकरी नसल्याने मला आर्थिक अडचणी येत होत्या. मला घर आणि मुलांच्या शाळेचा व्यय करतांना अडचणी येत होत्या. १८.८.२०२० या दिवशी मी कुलदेवी श्री भवानीदेवीची पूजा करून तिला प्रार्थना केली. मी तिला माझी अडचण सांगितली आणि मी नामजप करत बसलो. त्या वेळी अचानक मला सूक्ष्मातून गुरुदेवांनी सांगितले, ‘उद्या तुला तुझ्या जुन्या आस्थापनातील (‘अपार इंडस्ट्रीज लिमिटेड’मधील) वरिष्ठांचा दूरभाष येईल. तू रूजू हो.’ हे सर्व मी माझ्या पत्नीला सांगितले. वर्ष २००९ ते २०१७ या कालावधीत मी ‘अपार इंडस्ट्रीज लिमिटेड’च्या आस्थापनात काम केले होते. गुरुदेवांनी सांगितल्याप्रमाणे खरोखरच दुसर्या दिवशी, म्हणजे १९.८.२०२० या दिवशी त्या आस्थापनातील वरिष्ठांचा मला दूरभाष आला. त्यानंतर मी तेथे व्यवस्थापक म्हणून रूजू झालो.
माझ्यावर आलेल्या संकटातून गुरुदेवांनी मला बाहेर काढल्याने माझ्याकडून गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.’
– श्री. नीलेश शिवाजी कदम, वापी, गुजरात. (२९.९.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |