गाळमुक्त धरणाकडून गाळयुक्त शेतीकडे जातांना गाळाची प्रत पहाणे आवश्यक !

सध्याची शासनाची ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार (शेती)’, ही योजना चांगली असली, तरी गाळयुक्त शिवार करतांना आपण उचलून नेत असलेल्या गाळाची प्रत पहाणे आवश्यक ठरते. साठवलेल्या पाण्यामध्ये मुळात सुपीक मातीचा एक थर येऊनच त्याचे गाळामध्ये रूपांतर होते; मात्र सतत पाण्यात राहिल्यामुळे त्यात अजिबात प्राणवायू राहिलेला नसतो. अनेक वर्षांपासून गाळ साचलेला असल्याने तो कुजून त्यात मिथेन वायू मोठ्या प्रमाणात असतो, तसेच मिथेन वायूची निर्मिती करणारे जिवाणूही भरपूर असतात.

शेतभूमीत गाळ टाकण्याची प्रक्रिया चालू असतांनाचे छायाचित्र

१. शेतभूमीत गाळ हा पिकाला उपयुक्त जिवाणूंवर नकारात्मक परिणाम करण्याची शक्यता

ज्या वेळी आपण हा गाळ तसाच शेतात टाकतो, त्या वेळी हे मिथेन निर्माते जीवाणू शेतभूमीमधील पिकाला उपयुक्त अशा जिवाणूंवर नकारात्मक परिणाम करू शकतात. त्यात पुन्हा मुसळधार पाऊस पडून शेतात पाणी साचल्यास हे मिथेन जीवाणू डोके वर काढून कुजण्याच्या क्रियेला वेग देतात. परिणामी शेतामधील उभ्या पिकांची मुळेसुद्धा त्यांच्या भक्ष्यस्थानी पडू शकतात.

गाळाचा अजून एक महत्त्वाचा भौतिक गुणधर्म म्हणजे त्यांच्या अतीसूक्ष्म कणांचे आपापसांमधील आकर्षण आणि त्यामुळेच निर्माण होणारा घट्टपणा. या गुणधर्मामुळेच तलाव, धरण किंवा छोटे ‘चेकडॅम’ यामध्ये गाळ साचल्यानंतर पाणी मुरण्याचे प्रमाण न्यून होत जाते, तसेच पाणी वेगाने साठून आजूबाजूस पसरू लागते. आता आपण गाळमुक्त धरण हे पाहूया.

२. धरणातून काढलेला गाळ शेतात टाकण्यापूर्वी त्यावर प्रक्रिया करणे आवश्यक

तलाव, नाले, बंधारे आणि धरणांमध्ये गाळ येण्यासाठी कोण उत्तरदायी आहे ? तर माणूस, त्यातही शेतकरी आणि आपण करत असलेली रासायनिक शेती. म्हणून ‘धरणे गाळमुक्त’ करण्यामध्ये शासनाइतकाच वाटा शेतकर्‍यांनी उचलणे आवश्यक आहे.

खरेतर शासनानेही धरणातील काढलेला गाळ शेतात तसाच टाकण्यापेक्षा त्यावर थोडी साधी सोपी प्रक्रिया करण्याकडे लक्ष दिले पाहिजे. काढलेला गाळ सर्वप्रथम झाडांच्या सावलीमध्ये मोठ्या ढिगार्‍यासारखा रचावा. प्रत्येक २-३ दिवसांनी यंत्राच्या साहाय्याने वर खाली केला पाहिजे. याचे पुढीलप्रमाणे लाभ होतील –

अ. सावलीमध्ये ठेवल्याने प्रखर सूर्यप्रकाशामुळे त्यातील उपयुक्त मूलद्रव्यांचा र्‍हास होणार नाही.

आ. गाळ वर-खाली केल्यामुळे त्यातील सुप्त मिथेन वायू न्यून होत जातो.

इ. गाळाचे सूक्ष्म कण वेगळे होऊन त्यांचा घट्टपणा आपोआपच न्यून होतो.

ई. त्यातील अतिरिक्त ओलावा न्यून होऊन योग्य ती आर्द्रता शिल्लक रहाते.

अशा प्रकारे थोडी प्रक्रिया केलेल्या गाळामध्ये शेतकर्‍याने कमीत कमी २० टक्के सुकलेले शेणखत मिसळावे, म्हणजे त्या गाळामध्ये उपयुक्त जिवाणूंचे प्रमाण वाढण्यास साहाय्य होते.

उ. शेतामध्ये असा गाळ टाकतांना एकाच जागी मोठा ढीग करण्यापेक्षा सर्वत्र सारखा फेकावा किंवा वेगवेगळ्या ठिकाणी छोटे छोटे ढीग करून त्यावर उन्हाळी नांगरट करावी.

ऊ. शेतात गाळ टाकण्याची प्रक्रिया नेहमी रब्बी पिकांच्या काढणीनंतरच करावी.

ए. गाळ टाकलेल्या भूमीत पहिल्या वर्षी भाजीपाला, कंदमुळे, वेलवर्गीय पिके घ्यावीत. त्यामुळे उत्पादन तर भरपूर मिळतेच. त्यासह ती भूमी पुढील पिकास अधिक पोषक ठरते.

ऐ. गाळयुक्त शेतभूमीमध्ये पाणी व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचे ठरते. येथे आवश्यकतेपेक्षा अधिक पाणी पिकास घातक ठरू शकते. गाळयुक्त भूमी पाणी धरून ठेवते. त्यामुळे प्राणवायूविरहित वातावरण निर्माण होण्याची अधिक शक्यता असते.

ओ. भूमीमध्ये टाकलेल्या गाळाचे सकारात्मक परिणाम मिळण्यास पहिली २-३ वर्षे सहज लागतात. या ठिकाणी रासायनिक खतांचा वापर मर्यादित असावा.

क. गाळ घातलेल्या भूमीत पहिल्या वर्षी पावसाचे पाणी आपल्याला हवे तेवढे मुरत नाही; मात्र पुढील काळात पडणारे सर्व पाणी भूमीत मुरते आणि शेतकर्‍यांना रब्बीचे शाश्वत उत्पादन मिळू लागते.

३. कोकणातील खाड्या वाचवणेही महत्त्वाचे

आज आपण फक्त धरणामधील साठलेल्या गाळावरच भाष्य करत आहोत; मात्र समुद्रालगत असलेल्या खाड्यांविषयी कुणीही काही बोलत नाही. ठाण्यामधील खाडी तिच्यामध्ये साठलेल्या गाळामुळे वहाण्याचीच थांबली आहे. ४० वर्षांपूर्वी हीच खाडी एखाद्या नदीप्रमाणे वहातांना मी पाहिलेली आहे. तिला अशी स्थिर पाहून मनास वेदना होतात. थांबलेल्या या खाडीमुळे त्यात मासेमारी करून जगणारी सहस्रो कोळी कुटुंबे पारंपरिक मासेमारीच्या व्यवसायापासून वंचित झाली आहेत. ठाणेच काय; पण कोकणामधील जवळपास सर्वच खाड्या गाळाने भरलेल्या आहेत. दोन दशकांपूर्वीपर्यंत या सर्व खाड्यांमधून लहान मोठ्या बोटींनी प्रवास करता येत असे.

समुद्रास येणार्‍या भरतीमुळे या सर्व प्रवासी बोटी अगदी सहजपणे किनार्‍यास लागत. आज या खाड्यांमध्ये साधी नाव वल्हवत नेणेसुद्धा कुशलतेचे काम झाले आहे. ४ वर्षांपूर्वी घोषित झालेली ‘सागरमाला’ योजना आज कुठे आहे ? हे समजत नाही. जलवाहतूक ही जीवाश्म इंधन वाचवून वातावरण पालटावर मात करणारी एकमेव योजना समजली जाते; पण अजूनही आम्हास त्याचे महत्त्व समजत नाही. रस्ते वाहतुकीचा खर्च १० रुपये प्रति कि.मी. असेल, तर रेल्वेचा हाच दर ६ रुपये येतो; मात्र जल वाहतुकीचा खर्च जेमतेम १ रुपया अथवा त्यापेक्षाही न्यून येतो.

कोकणामधील खाड्या गाळाने भरण्याकरता तेथील डोंगरावरील प्रचंड वृक्षतोड उत्तरदायी आहे. पूर्वी कोकणात डोंगर माथ्यास ‘सडा’ म्हणत, तर पायथ्याला ‘मळा’. पूर्वी सड्यावर पाणी साठले की, पायथ्याला शेतकर्‍यांचे मळे वर्षभर फुललेले आढळत. याचमुळे खाड्या आपोआप गाळमुक्त रहात असल्याने किनार्‍यापर्यंत बोट वाहतूक व्यवस्थित होत असे. आज कोकणामधील ‘सडा’ आणि ‘मळा’ ही पारंपरिक पाणी व्यवस्थापनाची परंपरा इतिहास जमा झाली आहे. डोंगरावरील मातीला आधार नसल्याने ती मोकळी होऊन पायथ्याला असलेल्या खाडीत अथवा नदीत सहज मिसळली जात आहे. ही बहुमोल माती वाचवण्यासाठी आपणास डोंगर माथ्यावर असलेल्या कातळावर म्हणजेच सड्यावर पावसाचे पाणी अडवून ते साठवणे आवश्यक झाले आहे.

हे साठलेले पर्जन्य जल भूमीत झिरपून संपूर्ण डोंगरास हरित करू शकते. असे झाल्यास डोंगर उतारावरून खाली नदीपात्रात येणारे दगडधोंडे नियंत्रणात रहातील. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे नद्या शांत होतील. प्रतिवर्षी महाड, राजापूर, चिपळूणसारख्या शहरांचे रस्ते नद्यांच्या पुरामुळे आणि त्यामधील गाळाने भरून जातात, हे निश्चित थांबू शकते.

४. गाळ आणि कृषी उत्पादन यांतील संबंध

तलाव आणि धरणे यांमधील गाळ काढतांना त्या नैसर्गिक पाणीसाठ्याच्या मूळ भूपृष्ठास हानी पोचणार नाही, याची खबरदारी घ्यावयास हवी; कारण गाळ काढणे आणि तळाची माती उकरून खोलीकरण करणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. गाळ काढणे, म्हणजे मानवनिर्मित पापक्षालन, तर खोलीकरण करणे म्हणजे मूळच्या नैसर्गिक परिसंस्थेस धक्का पोचवण्यासारखे आहे.

तलाव अथवा धरणे यांची निर्मिती करण्याच्या वेळी भूजलतज्ञ, शास्त्रज्ञ सर्व वैज्ञानिक गोष्टींचा अभ्यास करतात. त्यावरून त्या धरणाची लांबी, रुंदी, पाणी साठण्याची क्षमता, त्याचे दरवाजे, पाण्याचे वितरण आणि धरणामुळे भूगर्भात किती जलसाठा वाढू शकतो ? याचे नियोजन केले जाते. त्यावरून त्या धरणाचे आयुष्य ठरवतात.

४ अ. धरणे गाळाने भरणे म्हणजे पाणीसाठी न्यून करणे !

‘राष्ट्र विकासामध्ये लहान मोठ्या धरणांचे आयुष्य किमान ५० ते १०० वर्षे असावे’, असे मानले जाते; मात्र सध्याची गाळाने भरलेली धरणे पाहिल्यावर त्यांचे आयुष्यमान किती झपाट्याने न्यून झाले आहे, याचा सहज अंदाज बांधता येतो. आपल्या देशामधील लहान-मोठी धरणे गाळाने भरत आहेत, ही चिंतेचे आहे. ‘सेंट्रल वॉटर कमिशन’च्या (CWC) काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार देशामधील १४६ मुख्य धरणांमध्ये आज मागील वर्षाच्या तुलनेत ६ टक्के पाणी न्यून झाले आहे. मागील १० वर्षांत या सर्व धरणांमधील जिवंत पाणीसाठा सरासरी १२१ टक्के होता, तो या वर्षी ९४ टक्क्यांपर्यंत घसरला आहे.

आपल्या देशामधील अर्ध्यापेक्षा अधिक कृषिक्षेत्र हे या सर्व धरणांच्या सिंचनावर अवलंबून आहे. यावरून धरणामधील गाळ, कृषी उत्पादन आणि जनतेची अन्नसुरक्षा हे तीनही विषय एकमेकांवर कसे अवलंबून आहेत, ते समजते.

– डॉ. नागेश टेकाळे, शेतीविषयक प्रश्नांचे अभ्यासक, मुंबई.

(साभार : दैनिक ‘ॲग्रोवन’)