१. ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या काळात प्रसाद देण्याची सेवा करतांना शिकायला मिळालेली सूत्रे
१ अ. ‘इतरांना कसे समजून घ्यावे ?’, हे सौ. वर्धिनी गोरल यांच्याकडून शिकायला मिळणे : ‘१६ ते २२.७.२०२३ या काळात रामनाथी (गोवा) येथे ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ पार पडला. या काळात हिंदुत्वनिष्ठांना प्रसाद देण्याच्या सेवेचे दायित्व असलेल्या साधिका सौ. वर्धिनी गोरल (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय २७ वर्षे) यांनी मला एक सेवा आपुलकीने समजावून सांगितली होती. ती सेवा सांगून झाल्यानंतर तिने मला विचारले, ‘‘तुला या सेवेमध्ये काही अडचण नाही ना !’ तेव्हा मला त्यांच्याकडून ‘इतरांना समजून घेणे कसे असले पाहिजे ?’, हे शिकायला मिळाले.
१ आ. परिपूर्ण सेवेची तळमळ असलेले श्री. देवदत्त कुलकर्णी आजोबा (वय ८० वर्षे) ! : प्रसाद भांडारात एक वयस्कर साधक श्री. देवदत्त कुलकर्णी आजोबा (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ८० वर्षे) सेवेला आहेत. त्यांना सेवा करतांना कधी काही अडचणी आल्यास ते मला ‘‘ताईला विचारून मला सांग. तुझी सेवा पूर्ण झाल्यावर विचार. सेवा मध्येच थांबवून विचारू नकोस’’, असे सांगत. सेवा झाल्यानंतर जर मी विचारायला विसरले, तर ते मला पुन्हा आठवण करून देत. यात मला आजोबांची सेवेविषयीची तळमळ शिकायला मिळाली. हे केवळ या काळातील सेवेमध्येच नाही, तर इतर वेळीसुद्धा शिकायला मिळते.
१ इ. सौ. अनुराधा निकम काकू (वय ६४ वर्षे) यांच्याकडून प्रेमभाव शिकायला मिळणे : प्रसाद भांडारात सेवेसाठी अन्य एक वयस्कर साधिका सौ. अनुराधा निकमकाकू (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ६४ वर्षे) आहेत. त्यांना कुठले साहित्य सेवेसाठी हवे असल्यास त्या मला ‘‘श्रिया, मला हे देऊ शकतेस का गं ?’’ असे प्रेमाने विचारतात. त्यामध्ये त्यांच्यातील प्रेमभाव मला शिकायला मिळतो.
१ ई. सुश्री दीपिका आनंद यांच्याकडून ‘सेवेचे परिपूर्ण नियोजन कसे असावे ?’, हे शिकायला मिळणे : प्रसाद भांडारातील अन्य एक साधिका कु. दीपिका आनंद मावशी (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ४८ वर्षे) हिने मला ‘सेवांचे नियोजन कसे करायला पाहिजे ?’ हे शिकवले. तिने केलेले नियोजन इतके परिपूर्ण होते की, मला सेवेचा कुठलाही ताण आला नाही किंवा माझी धावपळ झाली नाही. ही सेवा नियोजनबद्ध झाल्यामुळे मला सेवेत गुरुतत्त्व अनुभवता आले. यामध्ये मला त्यांच्याकडून ‘परिपूर्ण नियोजन कसे असायला हवे ?’ हे प्रकर्षाने शिकायला मिळाले.
२. ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या काळात आलेल्या अनुभूती
२ अ. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले प्रत्येक सेवा करून घेत आहेत’, अशी अनुभूती येणे : ‘या काळात प्रसाद भांडारात सेवा करतांना ‘प्रत्येक सेवा मी करत नसून, ती गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) माझ्याकडून करून घेत आहेत’, असे मला वाटत होते.
२ आ. प्रथमच सेवा करत असूनही सेवेविषयी आपुलकी जाणवणे : मी ही सेवा पहिल्यांदाच करत होते, तरीही मला या सेवेविषयी आपुलकी जाणवत होती. ‘ही सेवा नवीन आहे किंवा मी ही सेवा प्रथमच करते आहे’, असे मला वाटत नव्हते.
२ इ. ‘सेवेमध्ये त्रुटी राहिल्यास गुरुदेव त्या उत्तरदायी साधिकेच्या माध्यमातून लक्षात आणून देत आहेत’, असे जाणवणे : या सेवेत काही नवीन अंतर्भूत सेवा असल्याने माझ्याकडून तिच्यात काही त्रुटी रहात होत्या; पण ‘त्या त्रुटी गुरुदेव दायित्व असलेल्या साधिकेच्या माध्यमातून माझ्या लक्षात आणून देत आहेत’, असे मला जाणवत होते.
२ ई. सेवा नवीन असूनही तिच्याविषयी मनात सकारात्मक विचार येऊन त्याप्रमाणे कृती होणे : ‘ही सेवा नवीन आहे, तर ती मी कशी करणार ? यामध्ये माझ्याकडून काही रहाणार तर नाही ना ?’, असे विचार माझ्या मनात गुरुकृपेने आले नाहीत. ‘ही सेवा गुरुदेव माझ्याकडून करून घेणार आहेत. या सेवेच्या माध्यमातून गुरुदेव मला नवीन सेवा शिकवणार आहेत’, असे विचार आपोआप माझ्या मनात येऊन त्यांनुसार माझ्याकडून कृती होत होती.
२ उ. मनाची स्थिरता, निर्विचार स्थिती आणि अनुसंधान गुरुकृपेने टिकून रहाणे : सेवा करत असतांना माझ्या मनाची स्थिरता आणि निर्विचार स्थिती गुरुकृपेने टिकून रहात होती, तसेच सेवा करतांना अनुसंधानही अखंड टिकून रहात होते.
२ ऊ. केर काढण्याची सेवा करतांना गुरुदेव सूक्ष्मरूपाने प्रसाद भांडारात आल्याची अनुभूती प्रतिदिन येणे : मला प्रसाद भांडारातील केर काढण्याची नियमित सेवा मिळाली होती. काही वेळा प्रसाद भांडारात मी एकटीच असायचे. तेव्हा केर काढतांना ‘आता गुरुदेव येणार आहेत’, असे मला वाटत असे आणि मला मध्येच भास व्हायचा, ‘आता गुरुदेव आले आहेत अन् ते माझ्याकडे बघत आहेत’; मात्र प्रत्यक्षात दाराकडे पाहिले असता, तेथे कुणीच नसायचे. तेव्हा मी ‘गुरुदेव सूक्ष्मरूपाने प्रतिदिन प्रसाद भांडारात येत होते आणि मला प्रतिदिन ही अनुभूती घेण्याची संधी देत होते’, असे अनुभवले.
२ ए. प्रसाद भांडारात गुरुदेवांच्या अस्तित्वाची अनुभूती नित्य येणे : ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’पूर्वी, महोत्सवाच्या कालावधीत आणि त्यानंतरही मला गुरुदेवांचे अस्तित्व प्रसाद भांडारात अनुभवता येत आहे. प्रतिदिन गुरुदेव येथे येतात. ‘त्यांचे अस्तित्व आणि त्यांचे चैतन्य येथे आहे’, असे मला अनुभवता येत आहे.
२ ऐ. संतांकडून प्रसाद मिळाल्याने साधकांच्या गुरुदेवांविषयी जागृत होत असलेल्या भावाची अनुभूती घेता येणे : या काळात माझ्याकडे काही नवीन साधकांना प्रसाद देण्याची सेवा होती. मी त्या साधकांना भेटायला जायचे. तेव्हा ‘संतांनी प्रसाद दिला आहे’, हे कळल्यामुळे त्यांचा भाव जागृत व्हायचा. तेव्हा मला संतांविषयीचा त्यांचा भाव पुष्कळ प्रमाणात अनुभवता येत होता.
२ ओ. दिवसभर सेवा करूनही रात्री घरी गेल्यावर उत्साह अनुभवता आल्याने गुरुदेवच अखंड शक्ती आणि चैतन्य देत असल्याची जाणीव होणे : दिवसभर सेवा झाल्यानंतर मी रात्री घरी येत होते. तेव्हा एकदासुद्धा मला थकवा जाणवला नाही किंवा माझे पाय दुखणे इत्यादी काहीच झाले नाही. मी दिवसभर उत्साह अनुभवला. दिवसभर मी जे चैतन्य अनुभवायचे, तेच मला रात्रीपण अनुभवता येत होते, म्हणजे ‘गुरुदेवच मला सेवा करत असतांना अखंड शक्ती आणि चैतन्य देत होते’, असे मला अनुभवता आले.
२ औ. सेवा करतांना नामजपाचा विसर पडल्यास गुरुदेवांच्या कृपेमुळे नामजप आपोआप चालू होणे : सेवा करतांना मला काही वेळा नामजपाचा विसर पडायचा. तेव्हा गुरुदेव ‘नामजप चालू आहे ना !’ हे लक्षात आणून देत होते. माझा नामजप थांबला असल्यास तो त्यांच्याच कृपेमुळे पुन्हा चालूही होत होता.
कृतज्ञता
‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या संपूर्ण काळामध्ये ‘प्रत्येक क्षणी गुरुदेव माझ्याकडून सेवा करवून घेत होते आणि तेच मला सेवा करण्यासाठी बळ देत होते’, असे मी अनुभवले. केवळ गुरुकृपेनेच मला ही सेवा करण्याची संधी मिळाली आणि ही सेवा करता आली, यासाठी गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’
– कु. श्रिया राजंदेकर (वय १२ वर्षे), फोंडा, गोवा. (जुलै २०२३) (वर्ष २०२१ मधील आध्यात्मिक पातळी ६६ टक्के)
|