१. गांडुळांच्या कार्यामुळे भूमीतील झाडांसाठी आवश्यक पोषक तत्त्वांमध्ये वाढ होणे : गांडूळ भूमीत एक छिद्र करून थेट १० फुटांपर्यंत आत जातात आणि दुसर्या छिद्रातून वर येतात. जातांना ते छिद्र आपल्या घामाने (शरिरातून निघणार्या विशिष्ट द्रव पदार्थाने) लिंपत जातात. त्यामुळे छिद्र लवकर बंद होत नाही. या छिद्रातून भूमीला प्राणवायू (ऑक्सिजन) मिळतो. गांडूळ भूमीतील खनिजे खातात आणि विष्ठेच्या रूपात वनस्पतीच्या मुळांना देतात. गांडुळांच्या विष्ठेत सामान्य मातीपेक्षा ५ पट अधिक नत्र (नायट्रोजन), ९ पट अधिक स्फुरद (फॉस्फरस) आणि ११ पट अधिक पालाश (पोटॅश) असते. (नत्र, स्फुरद आणि पालाश ही झाडांच्या वाढीसाठी आवश्यक असलेली भूमीतील मूलभूत द्रव्ये आहेत. – संकलक)
२. गांडुळांच्या कार्यामुळे भूपृष्ठाखालील पाण्याच्या पातळीत वाढ होणे : जेव्हा नैसर्गिक शेती होते, तेव्हा त्या शेतात एकरी लक्षावधी गांडूळ असतात. ‘हे गांडूळ रात्रंदिवस कार्यरत रहातील, तर ते शेतकर्यासाठी फुकटात किती खत सिद्ध करत असतील’, याची कल्पना करा ! गंमत म्हणजे हे गांडूळ भूमीमध्ये एवढी छिद्रे निर्माण करतात की, ती मोजलीही जाऊ शकत नाहीत. पाऊस पडला की, पावसाचे पाणी या छिद्रांतून थेट भूमीच्या पोटात जाते आणि नैसर्गिकपणे जल संधारण होते. जल साठवण्यासाठी आपण कोट्यवधी रुपये व्यय करत असतो; पण गांडूळ हे कार्य फुकटात करतात. ही नैसर्गिक शेती सर्वच ठिकाणी केली, तर पावसाचे पाणी भूमीत चांगल्या रितीने साठवले जाईल आणि भूपृष्ठाखालील पाण्याची पातळी आपोआप वाढेल. असे हे एक आश्चर्य आहे !
३. देशी आणि विदेशी गांडूळ यांमधील भेद : ‘केवळ भारतीय देशी गांडूळच शेतकर्याचा खरा मित्र आहे. सेंद्रिय शेतीमध्ये वापरले जाणारे गांडूळ खत (Vermicompost) बनवण्यासाठी विदेशी गांडूळ भारतात आणले गेले. ‘सेंद्रिय शेती’त ‘इसेनिया फेटिडा (Eisenia Foetida)’ हे विदेशी गांडूळ वापरले जातात. हे विदेशी गांडूळ १६ अंश सेल्सिअसपेक्षा न्यून आणि २८ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानांत जिवंत राहू शकत नाहीत. हे गांडूळ केवळ अर्धवट कुजलेले काष्ठ पदार्थ (पालापाचोळा, शेण इत्यादी) खातात. माती खात नाहीत. भारतीय गांडूळे मात्र हिमाच्छादित टेकड्यांपासून वाळवंटांपर्यंत एकसारखेच काम करतात. आता संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, विदेशी गांडुळांच्या विष्ठेत ‘आर्सेनिक’, पारा, शिसे यांसारख्या विषारी धातूंचे अंश असतात आणि शेतात ‘व्हर्मीकंपोस्ट’ (विदेशी गांडुळांची विष्ठा असलेले खत) वापरल्याने ते विषारी अंश वनस्पतींतून मानवी शरिरात जाऊ शकतात. त्यामुळे सेंद्रिय शेतीद्वारे ‘व्हर्मीकंपोस्ट’ घालून पिकवलेले धान्य ‘विषमुक्त’ असू शकत नाही.’ (२१.८.२०२२)
– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा.