अयोध्या येथील श्री रामललाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ५ वर्षे) यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे

राम मंदिर (अयोध्या ) येथील श्री रामलला यांची मूर्ति

१. श्री रामललाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या आदल्या दिवशी पू. वामन यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे

पू. वामन राजंदेकर

अ. ‘अयोध्या येथील श्रीराममंदिरात श्री रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होण्याच्या एक दिवस आधी (२१.१.२०२४ या दिवशी) दुपारी ४ वाजल्यापासून पू. वामन एक शब्दही बोलले नाहीत.

आ. त्या वेळी ‘ते केवळ स्थूलदेहाने येथे आहेत. त्यांची दृष्टी स्थिर आणि निर्गुणात आहे. ते सूक्ष्मातून कुठेतरी दुसरीकडे आहेत’, असे मला जाणवत होते.

इ. त्यांनी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास केवळ थोडे सूप घेतले. त्यानंतर त्यांनी काहीच खाल्ले नाही.

ई. पू. वामन म्हणाले, ‘‘मी श्रीराम नाही. मी त्यांच्याप्रमाणे वेश करणार नाही. पू. भार्गवरामदादा (सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु) श्रीरामाप्रमाणे आहेत. उद्या त्यांनी श्रीरामाप्रमाणे वेश करायला हवा.’’

२. श्री रामललाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी पू. वामन राजंदेकर यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

सौ. मानसी राजंदेकर

अ. श्री रामललाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पहातांना पू. वामन म्हणाले, ‘‘हे आपले नारायण आहेत. प्रत्यक्ष श्रीराम तिथे आहेत’, असेच जाणवते. आता सूक्ष्मातून आपत्काळ असेल. भारताची हिंदु राष्ट्राच्या दिशेने वाटचाल चालू होईल.’’

आ. श्री रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर (दुपारी १२.३० वाजल्यानंतर) पू. वामन थोडेसे बोलू लागले. त्या वेळी त्यांनी मला सांगितले, ‘‘मी सूक्ष्मातून नारायणांशी बोलत होतो. सूक्ष्मातून युद्ध चालू होते. मी नारायणांनी सांगितलेली सेवा करत असल्याने मी बोलत नव्हतो. प्रत्यक्ष श्रीरामाने तत्त्वरूपाने पृथ्वीवर जन्म घेतला आहे.’’ पू. वामन बोलत असतांना त्यांच्या चेहेर्‍यावर वेगळेच स्मितहास्य होते. त्यांच्या चेहर्‍यावर गुरुसेवा पूर्ण झाल्याचा आनंद दिसत होता.

इ. श्रीरामाच्या आरतीच्या वेळी पू. वामन यांचा भाव जागृत झाला होता.

ई. हा दिव्य भावसोहळा पहातांना पू. वामन यांनी अनुमाने १७ – १८ घंटे काही खाल्ले नव्हते. त्यांनी मला सांगितले, ‘‘मला तूप, मीठ, भात हवा आहे.’’ श्रीरामाची आरती झाल्यानंतर पू. वामन यांनी थोडा भात खाल्ला.

उ. त्यानंतर ते हळूहळू सामान्य स्थितीत येऊ लागले, तरीही संपूर्ण दिवस ते पुष्कळ शांत होते. ते जराही खेळले नाहीत.

३. पू. वामन यांच्या कृतींमागील लक्षात आलेला कार्यकारणभाव !

अ. पू. वामन यांची ही भावस्थिती पुष्कळ वेगळी होती.प.पू. गुरुदेवांची कृपा म्हणून मला हे अनुभवण्याची संधी मिळत आहे.

आ. संतांना सूक्ष्मातून कार्य करण्यासाठी जी परिस्थिती आवश्यक असते, ती ते निर्माण करतात. त्यासाठी त्यांना काही वेळा पुष्कळ शारीरिक त्रास सोसावा लागतो.

इ. पू. वामन यांना २१ जानेवारीपासून सर्दीचा त्रास होऊ लागला. ते बाह्य दृष्टीने रुग्णाईत होते. त्यामुळे त्यांच्याशी बोलायला किंवा खेळायला कुणी जात नव्हते. (त्या वेळी आम्ही नागपूर येथे माझ्या माहेरी होतो. तेथे आमचे पुष्कळ नातेवाईक आहेत आणि त्या सर्वांना पू. वामन यांच्याशी बोलायचे असते.) पू. वामन शांतपणे माझ्याजवळ बसून होते. ते काही वेळ डोळे उघडे ठेवून माझ्या मांडीवर झोपून होते. त्यामुळे त्यांच्या सूक्ष्मातील कार्यात काही अडथळा आला नाही.

ई. श्री रामललाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा घरी दूरदर्शनवर पहाण्यासाठी आम्ही दोघेच होतो. घरातील अन्य सर्व जण जवळच्या श्रीराममंदिरात गेले होते. त्या वेळी ‘पू. वामन केवळ देहाने माझ्याजवळ आहेत’, असे जाणवत होते; कारण आम्ही सकाळी ९ वाजल्यापासून सोहळा बघत असलो, तरीही ते एक शब्दही बोलत नव्हते. त्यांना काही सांगायचे असल्यास ते मला खूण करून सांगत होते.

उ. सर्व सोहळा बघतांना ते मला टेकून बसले होते; पण मला त्यांचे अस्तित्व जाणवत नव्हते. या पूर्वी अनुभवली नाही, इतकी शांतता मी त्यांच्यामध्ये अनुभवत होते. त्यांच्या या स्थितीमुळे मलाही निर्विचार स्थिती अनुभवता येत होती.

यातून ‘संतांच्या प्रत्येक कृतीमागे किती मोठा कार्यकारण भाव असतो !’, हे मला शिकायला आणि अनुभवायला मिळाले. ‘संतांचे समष्टी कार्य कसे चालते !’, याची सामान्य माणसाला जराही जाणीव होऊ शकत नाही. ‘आम्हाला हे अनुभवायला मिळते’, ही केवळ सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांची कृपा आहे.

४. २३.१.२०२४ या दिवशी पू. भार्गवराम प्रभु यांचे श्रीरामाच्या वेशातील छायाचित्र त्यांची आई सौ. भवानी यांनी साधिकेला भ्रमणभाषवर पाठवून भ्रमणभाष करणे

पू. भार्गवराम भरत प्रभु

४ अ. पू. भार्गवराम प्रभु यांचे श्रीरामाच्या वेशातील छायाचित्र पाहून पू. वामन यांनी दोन्ही हात जोडून त्यांना भावपूर्ण नमस्कार करणे : २३.१.२०२४ या दिवशी सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु यांची आई सौ. भवानी यांनी पू. भार्गवराम यांचे श्रीरामाच्या रूपातील छायाचित्र भ्रमणभाषवर पाठवले. ते छायाचित्र पाहून पू. वामन म्हणाले, ‘‘हेच प्रत्यक्ष श्रीराम आहेत’, असे जाणवते.’’ पू. भार्गवराम यांचे छायाचित्र पाहून पू. वामन यांनी दोन्ही हात जोडून त्यांना भावपूर्ण नमस्कार केला.

श्रीरामाच्या वेशात सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु

४ आ. पू. भार्गवराम प्रभु यांनी ‘पू. वामन अयोध्या येथे गेले आहेत का ?’ असे त्यांच्या आईला विचारणे आणि त्यांच्या आईने त्यांना ‘‘तुम्हाला असे वाटते आहे, तर पू. वामन सूक्ष्मातून अयोध्या येथे गेले असतील’, असे सांगितल्यावर पू. भार्गवराम यांनी स्मितहास्य करणे : २३.१.२०२४ या दिवशी सौ. भवानी प्रभु यांनी मला भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘पू. भार्गवराम काल दिवसभर विचारत होते, ‘‘पू. वामन अयोध्या येथे गेले आहेत का ?’’ मी त्यांना सांगितले, ‘‘ते अयोध्या येथे गेले नाहीत.’’ नंतर काही वेळाने पू. भार्गवराम पुन्हा मला म्हणाले, ‘‘पू. वामन अयोध्या येथे गेले आहेत’, असे जाणवत होते.’’ तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘‘तुम्हाला असे वाटते आहे, तर पू. वामन सूक्ष्मातून अयोध्या येथे गेले असतील.’’ त्या वेळी पू. भार्गवराम यांनी स्मितहास्य करत माझ्या बोलण्याला अनुमोदन दिले.

४ इ. या प्रसंगातून लक्षात येते, ‘संत अंतर्मनाने एकरूप असतात. पू. भार्गवराम आणि पू. वामन हे केवळ बाह्य दृष्टीने वयाने लहान आहेत; मात्र त्यांची सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता अफाट आहे.’

५. प्रार्थना आणि कृतज्ञता

हे सर्व केवळ प.पू. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेनेच होत आहे. ‘आम्ही हे अनुभवू शकतो आणि त्यातून आम्हाला शिकण्याची संधी मिळते’, ही केवळ त्यांची कृपा आहे. ‘प.पू. गुरुदेवा, आपल्या या अनंत कृपेच्या वर्षावात आम्हाला असेच रहाता येऊ दे’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे. आपल्या चरणी अनंत कोटी वेळा कृतज्ञता व्यक्त केली, तरीही ती अल्पच आहे.’

– सौ. मानसी राजंदेकर (पू. वामन यांची आई, आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ४० वर्षे), फोंडा, गोवा. (२४.१.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक