सांगली, २५ जानेवारी (वार्ता.) – राष्ट्रध्वजाचा मान राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा, तसेच त्याचा अवमान होऊ नये, यासाठी प्लास्टिकच्या राष्ट्र्रध्वजाचा वापर करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे.
प्रतिवर्षी प्रजासत्ताकदिन, महाराष्ट्र्रदिन, स्वातंत्र्यदिन, इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्त्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडा सामन्यांच्या वेळी विद्यार्थी अन् नागरिक यांच्याकडून कागद आणि प्लास्टिकच्या राष्ट्र्रध्वजाचा वापर करण्यात येतो. हा कार्यक्रम पार पडल्यानंतर फाटलेले कागदी, तसेच प्लास्टिकचे राष्ट्र्रध्वज मैदानात, रस्त्यावर, तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले असतात. असे राष्ट्र्रध्वज पायदळी तुडवले जातात. त्यामुळे राष्ट्र्रध्वजाचा अवमान होतो.
राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वजसंहितेच्या कलम १.२ ते १.५ मध्ये राष्ट्र्रध्वजाच्या उचित वापराविषयी प्रावधान केले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्र्रध्वजासाठी प्लास्टिकच्या वापरास मान्यता नाही. त्या अनुषंगाने सर्व आस्थापनांनी आवश्यक त्या उपाययोजना करून दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. राष्ट्र्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा. जाणीवपूर्वक राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याचा प्रयत्न केल्यास राष्ट्र्रीय अवमान प्रतिबंध कायदा १९७१ अन्वये कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणीही जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली आहे.