China Water Missiles :चीनने त्याच्या क्षेपणास्त्रांंमध्ये दारूगोळ्याऐवजी पाणी भरले !

  • अमेरिकेच्या गुप्तचर अहवालात खुलासा

  • सैन्य अधिकार्‍यांनी भ्रष्टाचार केल्याचाही आरोप !

वॉशिंग्टन (अमेरिका) – चीनच्या क्षेपणास्त्रांंमध्ये दारूगोळ्याऐवजी पाणी भरले आहे. या क्षेपणास्त्रांंचे झाकणदेखील व्यवस्थित उघडत नाहीत. ही क्षेपणास्त्रे उड्डाण करू शकत नाहीत; कारण त्यात शेकडो त्रुटी आढळून आल्या आहेत, असा खुलासा अमेरिकेच्या गुप्तचर अहवालात करण्यात आला आहे. ‘ब्लूमबर्ग’ने गोळा केलेल्या माहितीनुसार चीनच्या सैन्यदलातील उपकरणांच्या खरेदीमध्ये भ्रष्टाचार इतका वाढला आहे की, त्याचा शस्त्रांच्या गुणवत्तेवरही परिणाम झाला आहे.

या अहवालात म्हटले आहे की, वर्ष २०२१ मध्ये शिनजियांग वाळवंटात शेकडो आण्विक क्षेपणास्त्रे बनवली जात असल्याची माहिती समोर आली होती. याचा वापर चीनच्या शेजारी देशांना धमकावण्यासाठी केला जाणार होता. त्यानंतर २०२२ आणि २०२३ मध्ये चीनने शेजारील तैवानला त्रास दिला आणि त्याच्या दिशेने क्षेपणास्त्रेही डागली.

चीनच्या सैन्यदलातील भ्रष्टाचारामुळे काही मासांपूर्वीच  संरक्षणमंत्री ली शांगफू यांना पदावरून हटवण्यात आले होते. याखेरीज अलीकडेच शी जिनपिंग यांनी चिनी सैन्यदलातील ९  वरिष्ठ अधिकार्‍यांचीही हकालपट्टी केली होती.

संपादकीय भूमिका

चीन स्वतःला कितीही आधुनिक म्हणवून घेत असला, तरी त्याची उत्पादने किती निकृष्ट दर्जाची असतात, हे वारंवार जगापुढे येत आहे !