त्वचेचे आरोग्य ‘सौंदर्यप्रसाधनां’पेक्षा ‘आहारा’वर सर्वाधिक अवलंबून !

त्वचेच्या आरोग्याविषयी बोलतांना सर्वप्रथम सौंदर्यप्रसाधनेच डोळ्यांसमोर येतात; पण आपल्या शरिराची संरक्षक तटबंदी असलेल्या त्वचेचे पोषण हे आपण घेत असलेल्या आहारावरच सर्वाधिक अवलंबून असते. त्यासाठी आधी आपण त्वचेविषयी सर्वसाधारण माहिती जाणून घेऊ. त्वचेचे बाह्य आणि अंत:स्तर असे २ स्तर असतात. आतील स्तराच्या आश्रयाने रक्तवाहिन्या त्वचेच्या दोन्ही स्तरांचे पोषण करतात. पेशी जशा जुन्या होत जातात, तशा त्या आतून बाहेरच्या दिशेने जातात आणि मृत होऊन शरिराबाहेर टाकल्या जातात.

वैद्या (सौ.) मुक्‍ता लोटलीकर

१. त्वचेचे कार्य

अ. त्वचेला ‘संरक्षक तटबंदी’ म्हटलेले आहे; कारण बाह्य वातावरण आणि रोगजंतू यांपासून ती संरक्षण करते.

आ. त्वचा सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने ‘ड’ जीवनसत्त्व तयार करते. ज्यांच्यामध्ये या जीवनसत्त्वाची कमतरता असते, त्यांनी सकाळचे कोवळे ऊन अंगावर घ्यायला हवे.

इ. शरिरातील उष्णता आणि पाण्याचे प्रमाण नियंत्रित करण्याचे महत्त्वाचे कार्य त्वचा करत असते. तापामध्ये आपल्याला घाम येत नाही आणि शरीर तापमान वाढते. औषध घेतल्यावर आपल्याला घाम येतो आणि ताप उतरतो.

ई. त्वचाविकार निर्माण होण्यासाठी आपण घेत असलेला आहार फार महत्त्वाची भूमिका बजावत असतो. आहारापासून आपल्या शरिरात रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा आणि शुक्र या ७ धातूंची निर्मिती होत असते. त्यातील रस आणि रक्त उत्तम सिद्ध झाले, तर त्वचा निरोगी अन् कांतीयुक्त राहू शकते. त्यासाठी आहारही उत्तम असावा लागेल.

२. त्वचाविकार कशामुळे निर्माण होतात ?

अ. मसालेदार पदार्थांचे अतीप्रमाणात सेवन

आ. अतीप्रमाणात तिखट, खारट, आंबट पदार्थ खाणे. (हिरवी मिरची, कैरी, टोमॅटो, चिंच, दही, पंजाबी पदार्थ यांचे सेवन)

इ. आंबवलेल्या पदार्थांचे अतीप्रमाणात सेवन (इडली, डोसा, उत्तप्पा, ढोकळा, ब्रेड इत्यादी)

ई. विरुद्ध पदार्थांचे सेवन (मिल्क शेक, केळीचे शिकरण, अननसाचे रायते)

उ. मांसाहार करणार्‍या व्यक्तीमध्ये तो आहार न पचल्यास त्वचाविकार होतात.

ऊ. याखेरीज दिवसभरात पुष्कळ वेळा चहाचे सेवन, शीतपेय, रात्रीचे जागरण, मानसिक ताणतणाव, सौंदर्यप्रसाधनांचा अतीवापर, दारूसारखी व्यसने हे सर्व त्वचेचे आजार निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात.

३. त्वचा विकार होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी ?

अ. पचन सुधारण्याकरता जेवणाच्या वेळा पाळाव्यात, पचेल एवढेच खावे. रात्रीचे जागरण टाळावे. पडवळ, भोपळा, दोडकी अशा भाज्या, तसेच काकडी, गाजर, मुळा यांची कोशिंबीर खावी. फळांमध्ये द्राक्षे, डाळिंब, आवळा आणि पपई ही फळे खावीत.

आ. शरिरात पाण्याचे प्रमाण योग्य राहील, असे बघावे. तहान लागल्यावर थोडे थोडे पाणी प्यावे. ‘त्वचा तजेलदार रहाण्यासाठी पाणी भरपूर प्यायला पाहिजे’, अशा आशयाचे लिखाण समाजमाध्यमांतून प्रसारित होत असते; परंतु आवश्यक त्या प्रमाणात पाणी पिणे, हे आरोग्याच्या दृष्टीने योग्य ! अतिरेक कधीही घातकच !

इ. दूध पितांना त्यात नेहमी चिमूटभर हळद घालून प्यावे.

ई. आयुर्वेदानुसार त्वचा विकारांमध्ये रक्त दूषित झालेले असते. शरिरात अतीप्रमाणात वाढलेले पित्त रक्तात मिसळले की, रक्त दूषित होते. त्यामुळे वाढलेले हे पित्त न्यून करण्यासाठी विरेचन आणि दूषित रक्त शरिरातून काढणे, या दोन मुख्य चिकित्सा केल्या जातात.

उ. त्वचेवर रासायनिक पदार्थयुक्त सौंदर्यप्रसाधने वापरण्याऐवजी नैसर्गिक पदार्थ असलेले तेल, लेप, उटणे यांचा वापर करावा.

ऊ. त्वचा कोरडी राहील, असे बघावे. कपडे व्यवस्थित उन्हात सुकतील, असे पहावे. दमट कपडे घातल्यास त्वचेचा ओलसरपणा तसाच राहून बुरशीजन्य विकार होऊ शकतात.(पावसाळ्यात हे होण्याची शक्यता अधिक असते.)

ए. कपडे एकमेकांना वापरण्यास देण्यापूर्वी आणि वापरून झाल्यावर ते अवश्य धुवावेत.

– वैद्या (सौ.) मुक्ता लोटलीकर, पुणे (१८.१२.२०२३)