|
टोरंटो (कॅनडा) – खलिस्तान्यांनी येथील भारतीय दूतावासाबाहेर निदर्शने करत भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान करत तो जाळला. या वेळी पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. या वेळी खलिस्तान्यांनी कॅनडामध्ये स्थापन केलेल्या श्री हनुमानाच्या सर्वांत उंच मूर्तीवरही आक्षेप घेतला. कॅनडातील ब्रॅम्प्टनमध्ये श्री हनुमानाची ५५ फूट उंच मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. २३ एप्रिल २०२४ या दिवशी हनुमान जयंतीला ब्रॅम्प्टन येथील हिंदु सभा मंदिरात अभिषेक झाल्यानंतर मूर्तीची औपचारिक स्थापना केली जाणार आहे.
खलिस्तान्यांनी या वेळी भारतीय राष्ट्रध्वज भूमीवर ठेवून त्यावर बूट ठेवले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रध्वज जाळला. या वेळी ते खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येच्या प्रकरणी भारतीय राजनैतिक अधिकारी संजय कुमार वर्मा यांच्या अटकेची मागणी करत होते. भारतीय हिंदू कॅनडाशी एकनिष्ठ नसल्याचा आरोप केला, तसेच ‘अशा परिस्थितीत त्यांचे आराध्य दैवत हनुमानाची मूर्ती कॅनडात बसवायला द्यायची का?’, असा प्रश्न विचारला. (भारताशी प्रतारणा करणार्या खलिस्तान्यांनी एकनिष्ठतेविषयी गप्पा मारणे हास्यास्पद होय ! – संपादक)
संपादकीय भूमिकाकॅनडातील ट्रुडो सरकार शिखांच्या खासदारांच्या पाठिंब्यावर सत्तेत असल्याने त्यांनी पाठिंबा काढला, तर सरकार कोसळेल. यामुळेच सरकार खलिस्तान्यांना पाठीशी घालत आहे. त्यामुळे कॅनडात खलिस्तान्यांचे समर्थन नसणारे पूर्ण बहुमताचे सरकार आल्यावरच ही स्थिती पालटणार, ही वस्तूस्थिती आहे. असे असले, तरी भारताने सातत्याने अशा घटनेचा कठोरपणे विरोध करणे आवश्यक आहे ! |