पिरकोन (ता. उरण) फसवणूक प्रकरणातील ठेवीदारांना ३ मासांत ठेवी परत करू ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

नागपूर, ९ डिसेंबर (वार्ता.) – ‘रक्कम दामदुप्पट करून देतो’, असे सांगून रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील पिरकोन येथील सतीश गावंड याने ३५ कोटी ६६ लाख रुपयांची फसवणूक केलेल्या ठेवीदारांचे पैसे येत्या ३ मासांमध्ये देण्याचा प्रयत्न करू, अशी माहिती गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. यासंदर्भात भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘या प्रकरणातील आरोपींची मालमत्ता कह्यात घेऊन ती त्वरित विक्री करण्याच्या प्रक्रियेतील अडचणी सोडवण्यासाठी अभ्यास समिती नेमण्यात येईल. ठेवीदारांना पैसे परत करण्यासाठी सतीश गावंड याच्याकडील ९ कोटी रोख रक्कम, अधिकोषातील १० कोटी रुपये आणि १ कोटी ५० लाख रुपयांची स्थावर मालमत्ता शासनाने कह्यात घेतली आहे. अशा प्रकारच्या फसव्या विज्ञापनांपासून लोकांनी सावध व्हावे. सरकारकडूनही याविषयी जागृती करण्यात येत आहे. अशी फसवी विज्ञापने पडताळण्याची सूचनाही आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाला देण्यात आली आहे.’’