नागपूर, ८ डिसेंबर (वार्ता.) – अवकाळी पावसामुळे झालेली शेतीची हानी आणि सरकारकडून दिली जाणारी हानीभरपाई याविषयी चर्चेची मागणी ८ डिसेंबर या दिवशी विधानसभेत विरोधकांनी केली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तारांकित प्रश्नांच्या वेळेत या चर्चेसाठी वेळ देण्याची मागणी केली; मात्र अध्यक्षांनी अनुमती नाकारल्यानंतर त्यांनी लक्षवेधी सूचनांच्या वेळेत चर्चेची मागणी केली. यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावर मुख्यमंत्र्यांशी बोलून लवकरच याविषयी चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन दिले; मात्र समाधान न झाल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला.