विधान परिषद प्रश्नोत्तर…
नागपूर, ८ डिसेंबर (वार्ता.) – पालघर जिल्ह्यातील पाड्यांमधील रस्ते, वीज, पाणी, तसेच कुपोषणासाठी दिलेला आणि २ वर्षांत शासनाकडे परत गेलेला ४० कोटी रुपयांचा अखर्चित निधी परत मिळवून तो विकासकामांसाठी वापरला जाईल, असे आश्वासन ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी ८ डिसेंबर या दिवशी विधान परिषदेत तारांकित प्रश्नाला उत्तर देतांना दिले. शिवसेनेच्या सदस्या श्रीमती मनीषा कायंदे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.
त्याला उत्तर देतांना गिरीश महाजन म्हणाले की, पालघर जिल्ह्याच्या विकासकामांसाठी एकूण १६८ कोटी ७३ लाख रुपयांचे अनुदान मिळाले होते. त्यांतील १२७ कोटी रुपये व्यय झाले असून ४० कोटी रुपये शिल्लक आहेत, तसेच कोरोनाच्या काळात वर्ष २०२०-२१ मध्ये २५ कोटी रुपये, तर वर्ष २०२२ मध्ये १५ कोटी रुपयांची रक्कम शिल्लक राहिली होती. ही रक्कम शासनाच्या तिजोरीत परत गेली, तरी पुढे ही रक्कम पुन्हा परत मिळवून विकासकामांसाठी वापरली जाईल.