शर्मिष्ठा मुखर्जी यांच्या ‘प्रणव : माय फादर’ या पुस्तकामागे भाजप !  – विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप

विजय वडेट्टीवार

नागपूर, ८ डिसेंबर (वार्ता.) – माजी राष्ट्रपती दिवंगत प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी लिहिलेल्या ‘प्रणव : माय फादर’ या पुस्तकावरून राष्ट्रीय काँग्रेसमध्ये वादंग निर्माण झाला आहे. त्यांनी पुस्तकामध्ये काँग्रेसच्या नेत्या श्रीमती सोनिया गांधी, माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी, तसेच गांधी कुटुंबियांशी आलेल्या संबंधांचे स्पष्टीकरण केले आहे. त्यामुळे काँग्रेस गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. ‘प्रणव : माय फादर’ या पुस्तकामागे भाजपचा हात आहे’, असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

सौजन्य आजतक 

विजय वडेट्टीवार म्हणाले की, मुखर्जी हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. पक्षाने त्यांच्या क्षमतेला न्याय दिलेला आहे; परंतु आता शर्मिष्ठा असे का बोलतात, ते गूढ आहे. भाजप हा नेहमीच तिसर्‍या व्यक्तीच्या माध्यमातून आपल्या पक्षाच्या लोकांना अपकीर्त करण्याचा छुपा अजेंडा (मोहीम) राबवत आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘‘मी हे पुस्तक वाचलेले नाही. त्यामुळे त्यावर मी कोणतेही विधान करणार नाही. प्रणवदादांशी माझे पुष्कळ चांगले संबंध होते; पण पुस्तक न वाचता कोणत्या संदर्भात शर्मिष्ठा काय म्हणाली आहे ? याविषयी भाष्य करणे योग्य होणार नाही.’’