कोरोना महामारीमुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांच्या शुल्क माफीचा अहवाल देण्याचा उच्चशिक्षण विभागाचा आदेश !

पुणे – कोरोना महामारीमुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे पदवी आणि पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत संपूर्ण शुल्क माफ करावे अन् इतर विद्यार्थ्यांचेही या कालावधीतील अतिरिक्त शुल्क माफ करावे, अशा सूचना उच्चशिक्षण विभागाने सर्व विद्यापीठ आणि महाविद्यालये यांना दिल्या होत्या; मात्र अनेक महाविद्यालयांनी या आदेशाचे पालन केले नाही. त्यामुळे उच्चशिक्षण विभागाने या संदर्भातील अहवाल मागवला आहे. उच्चशिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी तसा आदेश परिपत्रक काढून दिला आहे.

महाविद्यालय आणि विद्यापीठ विभागातील सर्व अभ्यासक्रमांसाठीच्या इतर शुल्कांमधील ज्या गोष्टींवर खर्च झाला नसेल, त्यासाठीचेही शुल्क पूर्णपणे माफ करावे, २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात ज्या परीक्षा झाल्या नाहीत, त्याचेही परीक्षा शुल्क पुढील शैक्षणिक वर्षात समायोजित करावे, विद्यार्थ्यांकडे प्रलंबित असलेले शुल्क ३ ते ४ टप्प्यांत भरण्याची सवलत द्यावी, शुल्क थकीत असल्यास परीक्षेचा अर्ज करण्यास अडवणूक करू नये, अशा सूचना दिल्या होत्या.