भारतातील महान ऋषि परंपरा (लेखांक ८)
वेद, उपनिषदे आणि पुराण ग्रंथांत ऋषींचा अनेकदा उल्लेख आलेला आहे. भारतीय संस्कृतीचे योग्य आकलन होण्यासाठी या सदराच्या माध्यमातून आपण ऋषि परंपरा समजून घेत आहोत. या लेखात महर्षि वसिष्ठ यांच्याविषयी जाणून घेऊया.
१. महर्षि वसिष्ठ यांचा थोडक्यात परिचय
‘वसिष्ठ हे एक वैदिक ऋषि होते. मनूने त्यांची ‘सप्तर्षी’ आणि ‘दशप्रजापती’ यांमध्ये गणना केली आहे. ‘ब्रह्मदेवाच्या प्राणवायूपासून हा निर्माण झाला’, असेही एके ठिकाणी म्हटले आहे. हा वंश प्रवर्तक असून ऋग्वेदातील सूक्तांचा कर्ताही आहे. यज्ञकर्मे पार पाडणारे राजगुरु, राजपुरोहित ब्राह्मणत्वाचा आदर्श असलेले हे महर्षि आहेत.
वसिष्ठ हे ‘वसु’ या शब्दाचे तमभाववाचक रूप आहे. ‘वसु’ म्हणजे संपन्न वा समृद्ध ! ‘वसिष्ठ’ म्हणजे सर्वांत अधिक समृद्ध ! त्यांच्याकडे अद्भुत सामर्थ्य असलेली कामधेनू नावाची गाय होती. त्यांच्या नावाच्या अर्थाशी ती सुसंगत आहे. सर्वच वस्तूंचे व्यवस्थित नियंत्रण करत असल्यामुळे त्यांना ‘वसिष्ठ’ म्हणतात. ‘वसिष्ठांचा जन्म ‘मित्र’ आणि ‘वरुण’ या दोन देवांपासून झाला’, असे ऋग्वेदात म्हटले आहे. त्यावरून त्यांना ‘मैत्रावरुण’ किंवा ‘मैत्रावरुणी’ असेही म्हटले जाते.
महर्षि वसिष्ठ हे उजव्या बाजूला कलत्या जटा बांधणारे, शुभ्रवस्त्रधारी, पवित्र विचारांचे प्रवर्तक होते. त्यांना अग्नि, वायू आणि आदित्य यांचे ज्ञान होते. ‘त्यांचा महिमा सूर्याप्रमाणे निर्विवाद आणि समुद्राप्रमाणे अगाध होता’, असेही म्हटले आहे.
२. महर्षि वसिष्ठ यांच्या जन्माचा वेद-पुराणांतील उल्लेख
‘ऊर्वशीपासून वसिष्ठांचा जन्म झाला’, असाही एक निर्देश ऋग्वेदात आला आहे. या जन्मात वसिष्ठांचा बंधु अगस्त्य होता, तर पत्नी नारदांची बहीण अरुंधती ही होती. ऋग्वेदाच्या या मंडळाच्या रचनेचे श्रेय वसिष्ठ कुलाला दिले जाते. ऋग्वेदाच्या सातव्या मंडळात वसिष्ठ पुत्रांचे वर्णन आहे. ऋग्वेदात वसिष्ठांच्या काही कुटुंबियांचे उल्लेख आलेले आहेत. त्यात शक्ती, पराशर, मूळीक, चित्रमहस् गौरवीती आहेत. विष्णुपुराणात ‘दक्षाची कन्या ‘ऊर्जा’ ही वसिष्ठांची पत्नी होती आणि ते ईक्ष्वाकु घराण्याचे पुरोहित होते’, असे म्हटले आहे. वसिष्ठांच्या नावावर एक ‘स्मृती’ही प्रसिद्ध आहे.
‘वसिष्ठ’ हे ब्रह्मदेवाच्या दहा मानसपुत्रांपैकी एक होत’, असेही मानले जाते. ‘अरुंधतीला वसिष्ठांपासून १०० पुत्र झाले’, असा एक उल्लेख आला आहे. त्यामध्ये शक्ती हा ज्येष्ठ पुत्र होता असा भागवतात उल्लेख आहे. शक्तीचा पुत्र पराशर आणि पराशराला मत्स्यगंधेपासून ‘कृष्णद्वैपायन व्यास’ हा पुत्र झाला.
३. अरुंधती
वसिष्ठ आणि अरुंधती यांचा उल्लेख महाभारतात आदरपूर्वक आलेला आहे. ‘अरुंधती’ याचा अर्थ ‘जी आपल्या पतीला कधीही सोडून जात नाही आणि त्याला कधीही विरोध करीत नाही’, असा आहे. सप्तर्षी तारकासमूहात ‘वसिष्ठ’ नावाच्या तार्याजवळ असलेल्या एका लहानशा तार्याला ‘अरुंधती’ हे नाव समर्पकपणे देण्यात आलेले आहे.
४. ऋषि वसिष्ठांचे कार्य
ऋग्वेदाच्या सातव्या मंडळाच्या काही सूक्तांच्या उल्लेखावरून ‘वसिष्ठ आणि त्यांचे कुटुंबीय आरंभी सरस्वती नदीच्या काठी वास्तव्य करून असावेत. नंतर परुष्णी नदीमार्गे यमुनातीरापर्यंत गेले असावेत. ‘विपाशा’ नदीच्या तीरावर वसिष्ठांचे दोन आश्रम होते’, असा उल्लेख ‘गोपथ’ ब्राह्मणात आलेला आहे. येथे वसिष्ठांनी तपश्चर्या केली होती.
अथर्ववेदातील एका सूक्तावरून असे दिसते की, वसिष्ठ हे आपल्या मंत्र सामर्थ्याने राजा आणि प्रजा यांना सुखसमृद्धी प्राप्त करून देत होते. त्यामुळे राजाप्रमाणे सर्वसामान्यांचाही विश्वास त्यांनी संपादन केला होता. ‘प्राचीन वरुणपंथ आणि नवा इंद्रपूजायपंथ यांच्यात समन्वय घडवून आणण्याची कामगिरी वसिष्ठांनी केली’, असे ऋग्वेदात वर्णन आहे.
– (साभार : राष्ट्र सेविका २६.१.२००४)