भारतातील महान ऋषि परंपरा (लेखांक ७)
‘प्रत्येकाला गोत्र असते. हे गोत्रर्षी कोण ? आपला आणि त्यांचा संबंध काय ? त्यांचे कर्तृत्व काय ? त्यांचा जन्म कुठे आणि कसा झाला ? याची माहिती या लेखाद्वारे घेऊया.
१. ऋषींचे गोत्रज किंवा वंशज म्हणजे काय ?
अ. आपले जे गोत्र असेल, त्या ऋषींचे आपण गोत्रज असतो, असे समजले जाते. कुलदैवत, देवी, देवता प्रमाणे कुलपुरुष पूर्वज, घराणे असते. अनेक जाती-जमातीमध्ये गोत्र एकच आहेत, म्हणजे आपण त्या ऋषींचे गोत्रज अथवा वंशज आहोत, ही समजूत आहे.
आ. पूर्वी प्रत्येक ऋषींचे आश्रम असत. त्या आश्रमांतून सर्व जाती-जमातीची मुले मुंज झाल्यावर शिक्षण घेण्यासाठी गुरुकुलात गुरुघरी येत असत. आता इयत्ता आणि तुकडी असते, त्याप्रमाणे त्या त्या ऋषींचा वर्ग त्यांच्या नावाप्रमाणे असण्याची शक्यता आहे. वसिष्ठ, अत्रि, गौतम आणि भरद्वाज या गुरुऋषींचे वर्ग असावेत. त्यामुळे तो ‘गोत्र विभाग’ कुटुंबास किंवा घराण्यास असावा, असा अंदाज आहे.
इ. आजही लग्न ठरवतांना गोत्राचा विचार केला जातो. एक गोत्र (सगोत्र) विवाह करत नाहीत. ‘करू नयेत’, असे म्हणतात. ‘आपण त्या ऋषींचे वंशज म्हणजे त्याच रक्तातील नातेवाईक’, असे समजून विवाहास विरोध करण्याची प्रथा पडली असावी. विभिन्न गोत्री विवाह केल्याने दुसर्या ऋषींचे ज्ञानही आपल्या कुटुंबात यावे, असा विचारही असू शकेल.
२. विवाह ठरवतांना गोत्रमिलनाचा होणारा विचार
अ. पंचांगानुसार पुढे दिलेल्या कुठल्या गोत्राचे कुठल्या गोत्राशी जुळते अथवा जुळत नाही, त्यावरून विवाह पूरक आहे कि नाही, ते ठरवले जाते. कुठल्या गोत्राचे कुठल्या गोत्राशी जुळत नाही, हे पुढील सारणीत दिले आहे, उदा. ‘आंगिरस’ गोत्राच्या पुढे ‘कुत्स’ आणि ‘मुद्गल’ ही गोत्रे लिहिली आहेत; म्हणजे ‘आंगिरस गोत्राचे कुत्स आणि मुद्गल या गोत्रांचे पटत नाही’, असे समजावे.
३. सगोत्र विवाह
सगोत्र विवाह करू नये. (सगोत्र म्हणजे वर आणि वधू यांचे गोत्र एक असणे.) ते शास्त्र संमत नाही; कारण मूळपुरुष एकच होतात. एका रक्तगटांचे असू शकतात. संतती होतांना त्रास होऊ शकतो किंवा संततीमध्ये दोष असू शकतो. ज्या गोत्रांचे एकमेकांशी पटत नाही, ते विवाह सगोत्रच ! दत्तक घेऊन लग्न करण्यास हरकत आहे का ?, असा प्रश्न विचारला जातो; पण तसेही करू नये. विवाहाच्या वेळी न्यूनतम २ गोष्टी पहाणे पुष्कळ महत्त्वाचे, ते म्हणजे सपिंड आणि सगोत्र ! वधू-वर दोघेही सपिंड आणि सगोत्र नसावेत.
अ. मामाच्या मुलीशी विवाह करणे कितपत योग्य ? : सगोत्र विवाहाप्रमाणे मामाच्या मुलीशी विवाह करणे कितपत शास्त्रसंमत ठरते ? असे विवाह झाल्यास संतती मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या दुर्बल किंवा पतित किंवा स्वभावाने अतिरेकी असण्याचा संभव असतो. विवाह ठरवण्यापूर्वी सपिंड संबंधीचा अभ्यास करून मग निर्णय घेण्याची प्रथा असे.
गोत्र ही भारतीय संस्कृतीने दिलेली देणगी आहे. धर्मसिंधु ग्रंथात त्याचा उहापोह आहे. गोत्राच्या ऋषींचे वंशज म्हणून आपण त्यांना वंदन करावे. त्यांचे शुभाशीर्वाद घ्यावेत. आपल्या गोत्राच्या ऋषींचा अभिमान अवश्य ठेवावा.’
– ज्योतिषी ब. वि. तथा चिंतामणी देशपांडे (गुरुजी)
(साभार : ‘वेदायन’ दिवाळी अंक २०१२)