लेखांक ४
काही ऋषींचा परिचय
वेदांतील ज्ञानाचा प्रसार करणारे थोर ऋषि मुनी, त्यांची परंपरा, कार्य, त्यांनी केलेले संशोधन आणि शिकवण यांची माहिती आजच्या समाजाला अत्यल्प आहे. भारतातील ऋषि परंपरा इतकी पुरातन आहे की, वेद, उपनिषदे आणि पुराण ग्रंथांत ऋषींचा अनेकदा उल्लेख आलेला आहे. भारतीय संस्कृतीचे योग्य आकलन होण्यासाठी या सदराच्या माध्यमातून आपण ही ऋषि परंपरा समजून घेत आहोत. मागील लेखात आपण सनकादी कुमार, महर्षि अत्रि, महर्षि शांडिल्य आणि महर्षि अगस्त्य यांची माहिती घेतली. या लेखात अन्य काही ऋषींचा परिचय करू घेऊया.
१. मार्कंडेय मुनी
मृकंडू नावाच्या ऋषींचा ‘मार्कंडेय’ हा पुत्र होय. मुलाच्या जन्मानंतर मृकंडू मुनींना समजले की, आपला पुत्र मार्कंडेय हा अल्पायु असून वयाच्या १२ व्या वर्षी मरणार आहे; परंतु मार्कंडेयाने वडिलांना सांगितले की, मी मृत्यूवर विजय मिळवीन. तुम्ही चिंता करू नका. मार्कंडेयाने उग्र तपश्चर्या करून भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतले आणि ‘माझे मृत्युपासून रक्षण करा’, असा त्यांनी शंकराजवळ वर मागितला. ‘बाराव्या वर्षी रेड्यावर बसलेला यमराज आपले प्राण नेण्यासाठी आला आहे’, असे पाहून मार्कंडेय शंकराच्या पिंडीला मिठी मारून बसला. यमराज मार्कंडेयावर मृत्यूचा पाश फेकणार, तोच पिंडीतून भगवान शंकर प्रकट झाले आणि यमावर त्रिशूळ मारून त्यांनी यमाला मूर्च्छित केले. नंतर शंकरांनी मार्कंडेयाला दीर्घायुष्य दिले आणि कल्पांतापर्यंत त्याला अमर केले. १८ पुराणांत ‘मार्कंडेय पुराण’ या नावाने एक स्वतंत्र पुराण आहे. त्यांच्या पत्नीचे नाव ‘धूमावती’ आणि पुत्राचे नाव ‘वेदशिरा’ असे होते.
२. आदिकवी वाल्मीकि
रामायणाचे लेखक म्हणून महर्षि वाल्मीकिंचे नाव प्रसिद्ध आहे. सीतादेवी वाल्मीकि ऋषींच्या आश्रमात प्रसुत झाली आणि तिचे दोन पुत्र लव अन् कुश वाल्मीकिंनी सांभाळले. त्यांना रामायण गायन आणि शस्त्रविद्या शिकवली.
उलट्या रामनामाचा ‘मरा’जप करून वाल्या कोळीचा ‘वाल्मीकि ऋषि’ बनला असे सर्वत्र प्रसिद्ध आहे. ऋषि वाल्मीकिंनी रचलेले रामायण हे आदिकाव्यच होय. वेदांतील काव्यरचना सोडली, तर व्यवहारात काव्य, म्हणजे कविता अशी रचना नव्हती. ती वाल्मीकिंनी केली; म्हणून ‘रामायण’ हे आदिकाव्य आणि वाल्मीकि हे आदिकवी झाले. ‘वल्माक’ म्हणजे ‘वारूळ’. तपश्चर्येत वाल्या कोळी इतका एकाग्र झाला की, त्याच्या अंगावर वारूळ निर्माण झाले, तरी त्याला समजले नाही. तपश्चर्येनंतर त्या वल्मीकांतून तो बाहेर आला; म्हणून त्यांना ‘वाल्मीकि’ हे नाव पडले.
३. महर्षि वसिष्ठ
महर्षि वसिष्ठ हे ब्रह्मदेवाच्या १० मानसपुत्रांपैकी एक असून ब्रह्मदेवाच्या आज्ञेने त्यांनी सूर्यवंशाचे पौरोहित्य स्वीकारले. त्यामुळे भगवान श्रीरामचंद्रांचेही हे कुलगुरु होते. यज्ञ संरक्षणासाठी राम-लक्ष्मणांना मागण्यासाठी आलेल्या विश्वामित्रांना दशरथाने नकार दिला; परंतु वसिष्ठांनी आज्ञा करताच दशरथाने विश्वामित्राला राम-लक्ष्मण दिले. वसिष्ठ हे शांतीचे सागर होते.
विश्वामित्राने द्वेषाने वसिष्ठांचे सर्व पुत्र मारले; तथापि ते रागावले नाहीत. विश्वामित्र वसिष्ठांची कामधेनू बळजोरीने पळवून नेऊ लागले. त्या वेळी कामधेनूच्या अंगातून सहस्रो सैनिक जन्माला आले आणि त्यांनी विश्वामित्रांचा पराभव केला. सप्तर्षिमंडळात वसिष्ठ अरूंधतीसह प्रतिष्ठित झाले आहेत. महर्षि वसिष्ठांचा पुत्र ‘शक्ति’, शक्तिचे पुत्र ‘पराशर’ आणि पराशरांचे पुत्र ‘व्यास’ होत. वसिष्ठांनी अनेक धर्मग्रंथ लिहिले. रामावतारानंतर वसिष्ठ पृथ्वीवर होते. रामावतारानंतर ते सप्तर्षिमंडळात स्थित झाले.’
(साभार : ‘अक्कलकोट स्वामीदर्शन ’ वर्ष १९ अंक ४ )