हिमाचल प्रदेशातील अनी येथील ५ हून अधिक इमारती कोसळल्या !

शिमला (हिमाचल प्रदेश) – राज्यातील कुल्लू जिल्ह्यात असलेल्या अनी येथे ५ हून अधिक इमारती २४ ऑगस्ट या दिवशी पत्त्याच्या घरासारख्या कोसळल्या. प्रशासनाने लोकांना आधीच बाहेर काढल्याने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अनी बसस्थानकाजवळ आणखी २ ते ३ इमारती कोसळण्याचा धोका असल्याचे सांगितले जात आहे.

१. अनी येथील प्रशासकीय अधिकारी नरेश वर्मा यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक प्रशासन घटनास्थळी पोचले असून हानीचा आढावा घेत आहेत.

२. कोसळलेल्या इमारतींची संख्या ७ ते ८ असू शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

३. ७ ते ११ जुलै या कालावधीत झालेल्या मुसळधार पावसामुळे या इमारतींना भेगा पडू लागल्या. हा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने आधीच जागा सोडण्यास सांगितले होते आणि इमारत मालकांना घरे रिकामी करण्याच्या नोटिसा दिल्या होत्या.

४. इमारती कोसळल्यामुळे अनी येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

संपादकीय भूमिका 

हिमाचल प्रदेशात प्रत्येक वर्षी अत्यधिक पाऊस असतोच; परंतु यंदा येथे मोठ्या प्रमाणात घरे आणि इमारती कोसळण्याच्या घटना प्रचंड प्रमाणात वाढल्या. यामागे डोंगरांवर मनमानी पद्धतीने इमारती बांधण्यात येत असल्याचे आरोप होत आहेत. या सर्वांचा परिणाम म्हणून झालेल्या जीवित आणि वित्त हानी यांसाठी उत्तरदायी असणार्‍यांना कठोर शिक्षाच व्हायला हवी !