‘चंद्रयान-२’च्‍या अपयशावरून ‘बीबीसी’ने भारतावर केलेल्‍या टीकेचा जुना व्‍हिडिओ प्रसारित !

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी बीबीसीला चोख प्रत्युत्तर देत खडसावले !

मुंबई – भारतीय ‘चंद्रयान-३’ मोहिमेचे यश साजरे करत असतांना ‘बीबीसी’ (ब्रिटीश ब्रॉडकास्‍टिंग कॉर्पोरेशन) वृत्तवाहिनीच्‍या निवेदकाने भारतावर केलेल्‍या टीकेचा जुना व्‍हिडिओ सामाजिक माध्‍यमांवरून प्रसारित झाला आहे. हा व्‍हिडिओ वर्ष २०१९ चा म्‍हणजे ‘चंद्रयान २’ मोहीम अयशस्‍वी झाल्‍यानंतरचा आहे.

हा व्‍हिडिओ प्रसारित झाल्‍यानंतर प्रसिद्ध भारतीय उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी बीबीसीचा समाचार घेतला आहे. बीबीसीने म्‍हटले आहे, ‘भारतात पायाभूत सुविधांचा अभाव आहे. तेथे अत्‍यंत गरिबी आहे. भारतातील बहुसंख्‍य लोकसंख्‍या दारिद्य्रात जगते. देशातील ७० कोटींहून अधिक लोकांकडे शौचालयेदेखील नाहीत. अशा परिस्‍थितीत चंद्रयान-३ सारख्‍या महागड्या प्रकल्‍पावर इतके पैसे खर्च का करावे?’ भारताने या मोहिमेवर ६१५ कोटी रुपये खर्च केले आहे. अमेरिका, रशिया, चीन यांच्‍या तुलनेत हे निम्‍म्‍याहून अल्‍प आहेत.

इंग्रजांनी लुटल्यामुळेच भारतात गरिबी ! – आनंद महिंद्रा

आनंद महिंद्रा

आनंद महिंद्रा म्‍हणाले, ‘‘खरंच? आमच्‍या देशात असलेली गरिबी ही तुम्‍ही लादलेल्‍या अनेक दशकांच्‍या वसाहतवादी राजवटीचा परिणाम होती. या राजवटीने संपूर्ण उपखंडातील संपत्ती पद्धतशीरपणे लुटली. तुम्‍ही आमच्‍याकडून लुटलेली सर्वांत मौल्‍यवान संपत्ती कोहिनूर हिरा नसून आमचा स्‍वाभिमान आणि आमच्‍या क्षमतेवर असलेला विश्‍वास, ही होती. चंद्रावर जाण्‍याने आम्‍हाला आमचा अभिमान आणि आत्‍मविश्‍वास वाढण्‍यास साहाय्‍य होते. यामुळे विज्ञानाच्‍या माध्‍यमातून होणार्‍या प्रगतीवर आमचा विश्‍वास वाढतो. यामुळे आम्‍हाला गरिबीतून बाहेर येण्‍याची प्रेरणा मिळते.’’

संपादकीय भूमिका

बीबीसीची भारतद्वेषी मानसिकता असल्‍याने तिच्‍याकडून याहून वेगळे काय घडणार ? अशा वृत्तवाहिनीवर भारतात बंदी घालणेच योग्‍य ठरील !