गोवा : कळंगुट येथे आग लागून ७० झोपड्या खाक

सिलिंडरच्या स्फोटामुळे लागली आग

आगीत अंदाजे ७० झोपड्या जळून खाक !

म्हापसा, १३ ऑगस्ट (वार्ता.) – आगरवाडो, कळंगुट येथील काही झोपड्यांना १३ ऑगस्टला दुपारी लागलेल्या आगीत अंदाजे ७० झोपड्या जळून खाक झाल्या. गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे ही आग लागली आणि ती वेगाने अन्य झोपड्यांत पसरली. अग्नीशमन दलाचे ४० ते ४५ सैनिक आग विझवण्यासाठी निकराचे प्रयत्न करत होते. सर्व झोपड्या एकमेकांना टेकून होत्या. त्यामुळे अग्नीशमन दलाला बंब पुढेपर्यंत नेणे शक्य झाले नाही. त्यामुळे काही ठिकाणी बंब न वापरता आग विझवण्यासाठी इतर पद्धत वापरण्यात आली. अंदाजे दीड घंट्याने आग आटोक्यात आणण्यात दलाला यश आले. पिळर्ण, म्हापसा, पर्वरी आणि पणजी येथून आग विझवण्यासाठी पाण्याचे बंब मागवण्यात आले होते. अग्नीशमन दलाने आगीतून २४ सिलिंडर बाहेर काढले. या घटनेत मोठी जीवितहानी झाली नसली, तरी १ जण आगीत भाजून घायाळ झाला. त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

या झोपड्यांमध्ये गेल्या १५ वर्षांपासून अंदाजे २०० जण रहात होते. या झोपड्यांमध्ये हंगामी तत्त्वावर काम करणारे कामगार रहात होते. झोपड्या कच्चा स्वरूपाच्या आणि पत्रे घातलेल्या होत्या. एका झोपडीत सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागल्यावर इतर झोपड्यांतील लोक बाहेर आले आणि त्यांनी त्यांच्या झोपडीपर्यंत आग येणार हे ओळखून त्यांचे साहित्य बाहेर काढले. काही जणांचे मात्र मौल्यवान साहित्य जळून खाक झाले आहे.

घटनेच्या अनुषंगाने काही प्रश्न

१. झोपड्यांमध्ये रहाणार्‍यांकडे घरगुती गॅस सिलिंडर कसे ?
२. झोपड्या गेल्या १५ वर्षांपासून अवैधरित्या उभ्या होत्या का ?
३. आगीसारखी घटना घडल्यास साहाय्य करता येणार नाही, अशा प्रकारे झोपड्या बांधेपर्यंत प्रशासन काय करत होते ?
४. स्थानिक पंचायत आणि लोकप्रतिनिधी यांचे लक्ष नाही का ?