गोवा : ‘तमनार’ वीजप्रकल्प रहित करण्याच्या मागणीसाठी सरकारवर विरोधकांचा दबाव

गोवा विधानसभा अधिवेशन

कर्नाटकमधून वीज न मिळाल्यास कोल्हापूर येथून वीज आणण्याचा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांचा दावा

‘तमनार’ वीजप्रकल्प

पणजी, ८ ऑगस्ट (वार्ता.) – ‘तमनार १ सहस्र २०० के.व्ही. वीजवाहिनी प्रकल्पासाठी कर्नाटकमध्ये वीजवाहिनीचा मार्ग अजूनही निश्चित झालेला नसतांना सरकार गोव्यात हा प्रकल्प निश्चित कसा काय करू शकते ? असा प्रश्न विरोधी गटातील आमदारांनी ८ ऑगस्ट या दिवशी विधानसभेत प्रश्नोत्तर तासाच्या वेळी उपस्थित केला. यानंतर विरोधकांनी ‘तमनार’ प्रकल्प रहित करण्याची मागणी लावून धरली. यावर उत्तर देतांना वीजमंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले, ‘‘प्रकल्पासाठी करण्यात आलेले काम वाया जाणार नाही. नियोजित भागातून वीजवाहिन्या गोव्यात आणण्यास कर्नाटक अपयशी ठरल्यास कोल्हापूर येथून वीज घेण्याची सरकारची सिद्धता आहे.’’ ‘गोवा फॉरवर्ड’चे फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी हा मूळ प्रश्न उपस्थित केला होता.

आमदार विजय सरदेसाई म्हणाले, ‘‘तमनार’ प्रकल्प सध्या सर्वाेच्च न्यायालयात आहे आणि उद्या जर कर्नाटकला नियोजित भागातून वीजवाहिन्या नेण्यास मज्जाव करण्यात आला, तर गोवा सरकारकडून करण्यात आलेली कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक वाया जाणार नाही का ?’’ विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, काँग्रेसचे हळदोणाचे आमदार कार्लुस फेरेरा, काँग्रेसचे केपेचे आमदार एल्टॉन डिकोस्ता आणि ‘आप’चे बाणावलीचे आमदार वेन्झी व्हिएगश यांनीही हे सूत्र लावून धरून प्रकल्प रहित करण्याची मागणी केली.

ऊर्जामंत्री श्री. सुदिन ढवळीकर

वीजमंत्री सुदिन ढवळीकर पुढे म्हणाले, ‘‘कर्नाटकातून वीज आणण्यासाठीचा हा विद्यमान प्रकल्प आंबेवाडी येथून चालू होतो आणि तेथून पुढे सांगोडा, धारबांदोडा, कुंकळ्ळी आणि शेल्डे या मार्गाने वीजवाहिन्या ओढल्या आहेत. या प्रकल्पासाठी १०३ मनोरे बांधण्याचे काम पूर्ण झालेले आहे. कोल्हापूरहून वीज आणायची झाल्यास थिवीहून वीज धारबांदोडा येथे आणि तेथून कुंकळ्ळीमार्गे शेल्डे येथे आणली जाईल,’’ तमनार प्रकल्पासाठी १४ सहस्र झाडे कापली जाणार नाहीत; मात्र नेमकी किती झाडे कापावी लागणार ? हे सांगण्यासाठी वीजमंत्री ढवळीकर यांनी वेळ मागितला.