कराड-निपाणी-बेळगाव रेल्‍वेमार्गाचे काम चालू करा ! – रेल्‍वेमंत्र्यांना निवेदन

निपाणी (कर्नाटक) – नवी देहली येथे रेल्‍वेमंत्री (श्री.) अश्‍विनी वैष्‍णव यांची निपाणी मतदारसंघातील आमदार सौ. शशिकला जोल्ले आणि चिकोडी लोकसभेचे खासदार श्री. अण्‍णासाहेब जोल्ले यांनी भेट घेऊन बर्‍याच दिवसांपासून प्रलंबित असलेल्‍या कराड-निपाणी-बेळगाव (१९१ किलोमीटर) या रेल्‍वेमार्गाचे काम लवकर चालू करण्‍याच्‍या संदर्भात निवेदन दिले. हा रेल्‍वे मार्ग पूर्णत्‍वास गेल्‍यास कर्नाटक-महाराष्‍ट्रातील सीमा भागातील लाखो नागरिकांची सोय होणार आहे. या प्रसंगी महाराष्‍ट्र भाजपचे उपाध्‍यक्ष श्री. अजित गोपछडे आणि बेळगाव भाजप अध्‍यक्ष श्री. संजय पाटील उपस्‍थित होते.

रेल्‍वेमंत्र्यांना दिलेल्‍या निवेदनात म्‍हटले आहे की, शेडबाळ-अथणी-विजयपूर आणि बेळगाव-कोल्‍हापूर या रेल्‍वेमार्गांचे काम लवकर पूर्ण करावे. मिरज-बेळगाव या मार्गावर हुबळी-दादर एक्‍सप्रेस (उगार येथे थांबावी), तसेच शरावती एक्‍सप्रेस आणि पुडुचेरी एक्‍सप्रेस (शेडबाळ येथे थांबावी), अजमेर एक्‍सप्रेस आणि हरिप्रिया एक्‍सप्रेस (कुडची, रायबाग, चिकोडी येथे थांबावी) अशीही मागणी करण्‍यात आली आहे.