चिपळूण तालुक्यातील कळवंडे धरणाच्या भिंतीला दिला प्लास्टिकचा आधार

लघु पाटबंधारे विभागाचा असाही कारभार !

धरणाच्या भिंतीला दिला प्लास्टिकचा आधार !

चिपळूण – तालुक्यातील कळवंडे येथील अनुमाने ४९ लाख रुपयांची धरणाची दुरुस्ती झाल्यानंतर काही दिवसांतच पडलेल्या पावसामुळे ‘पिचिंग’ खचले होते. एप्रिल मासात संबंधित ठेकेदाराने हे काम केले होते. ‘पिचिंग’ खचल्यामुळे या धरणाला धोका पोचण्याचा संभव असल्याने ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे. (निकृष्ट काम करणारा ठेकेदार आणि संबंधित प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून या कामाचा सर्व पैसा वसूल करायला हवा !, तरच अशा प्रकारांना थोडा तरी आळा बसेल ! – संपादक)

या पार्श्वभूमीवर उद्योजक दादा उदेग यांच्या मार्गदर्शनाखाली कळवंडे दत्तवाडी येथे बैठक घेण्यात आली आणि या बैठकीत लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांना ग्रामस्थांनी धारेवर धरले. ‘पिचिंग’ला भगदाड पडले कसे? धरणाला धोका पोचू शकतो. धरणाच्या खालील बाजूकडील लोकांच्या जीविताचा प्रश्न आहे, अशी अनेक सूत्रे या बैठकीत उपस्थित करण्यात आली. या वेळी पाटबंधारे विभागाचे उपअभियंता विपुल खोत यांनी धरणाला कोणताही धोका नाही. पावसाचा जोर अल्प होताच संबंधित ठेकेदाराकडून दुरुस्ती केली जाईल. खचलेल्या भागात प्लास्टिक टाकून माती भरण्यात येईल, असे आश्वासन दिले.

या धरणातील पाण्याचा कळवंडे, मिरजोळी, पाचाड, कोंढे, शिर आदी गावांना लाभ होतो. शेती करणे, उन्हाळ्याच्या दिवसांत पालेभाज्या, फळभाज्या, कलिंगड यांसारखी अन्य पिकेही घेतली जातात आणि त्यातून कळवंडे ग्रामस्थांचा आर्थिक व्यवहार चालतो; मात्र पुढच्या वर्षी धरण असेच रिकामे राहिल्यास या भागात पाणीटंचाई निर्माण होणार आहे आणि ग्रामस्थांचा आर्थिक प्रश्न निर्माण होणार आहे.