चातुर्मास्य (चातुर्मास)

‘आषाढ शुक्ल एकादशीपासून कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत अथवा आषाढ पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत होणार्‍या ४ मासांच्या काळास ‘चातुर्मास’, असे म्हणतात.

चातुर्मासाच्या काळात श्रीविष्णु क्षीरसागरात निद्रा घेत असतो, तसेच या काळात पडणार्‍या पावसाच्या पाण्यासह मातीतून नैसर्गिक शक्ती नदीत मिसळत असल्याने या काळात तीर्थक्षेत्री नदीमध्ये स्नान केल्याने पापक्षालन होते. वातावरणात रज-तमाचा प्रभाव वाढल्याने उपवास, व्रतवैकल्ये केल्यास ती अधिक फलद्रूप होऊन सात्त्विकता वाढवतात.

श्रीविष्णूच्या उपासनेसाठी उत्तम काळ

चातुर्मासाच्या काळामध्ये श्रीविष्णु शेषशय्येवर योगनिद्रा घेत असतो. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवसांमध्ये सूर्य कर्क राशीत स्थित असतो. श्रीविष्णूच्या उपासनेसाठी हा काळ उत्तम मानला जातो. सर्व तीर्थस्थाने, देवस्थाने, दान आणि पुण्य चातुर्मास आल्यावर श्रीविष्णूच्या चरणी अर्पण होतात.

चातुर्मासातील उपवासाचे महत्त्व

चातुर्मासात एकाच प्रकारच्या अन्नाचे भोजन करणारा मनुष्य निरोगी रहातो. केवळ एकवेळ भोजन घेणार्‍याला १२ यज्ञांचे फळ मिळते. जो केवळ पाणी पिऊन रहातो, त्याला प्रतिदिन अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते. जो केवळ दूध किंवा फळ खाऊन रहातो, त्याची सहस्रो पापे तात्काळ नष्ट होतात. जो १५ दिवसांतून एक दिवस उपवास करील, त्याच्या शरिरातील अनेक दोष नष्ट होतात आणि १४ दिवसांमध्ये त्याच्या शरिरात भोजन केल्यानंतर जो रस निर्माण होतो, त्याचे शक्तीत रूपांतर होते; म्हणून एकादशीचा उपवास महत्त्वपूर्ण असतो. हे ४ मास नामजप आणि तपस्या यांच्यासाठी अतीयोग्य आहेत. (संदर्भ : सनातन संस्थेचे संकेतस्थळ)

चातुर्मासातील व्रतवैकल्यांचे महत्त्व

पावसाळ्यात आपण आणि सूर्य यांच्यात ढगांचा एक पट्टा निर्माण झालेला असतो. त्यामुळे सूर्याचे किरण, म्हणजे तेजतत्त्व, तसेच आकाशतत्त्व एरव्हीइतके पृथ्वीवर पोचू शकत नाहीत. त्यामुळे वातावरणात पृथ्वी आणि आप तत्त्वांचे प्राबल्य वाढलेले असते. त्यामुळे वातावरणातील विविध जंतू, रज-तम किंवा काळी शक्ती यांचे विघटन न झाल्यामुळे या वातावरणात साथीचे रोग पसरतात आणि आळस किंवा मरगळ जाणवते.
व्रतवैकल्ये करणे, उपवास करणे, सात्त्विक आहार घेणे आणि नामजप करणे यांमुळे आपण शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या रज-तमाचा प्रतिकार करण्यास सक्षम होतो; म्हणून चातुर्मासात व्रतवैकल्ये करतात.

व्रत अवश्य करावे !

देवांच्या या निद्राकालात असुर प्रबळ होतात आणि मानवाला त्रास देऊ लागतात. ‘असुरांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत अवश्य करावे’, असे धर्मशास्त्र सांगते –
वार्षिकांश्चतुरो मासान् वाहयेत् केनचिन्नरः ।
व्रतेन न चेदाप्नोति किल्मिषं वत्सरोद्भवम् ॥

अर्थ : प्रतिवर्षी चातुर्मास्यात मनुष्याने कोणते तरी व्रत अवश्य करावे; अन्यथा त्याला संवत्सरोद्भव असे
पातक लागते.’

वैशिष्ट्ये

अ. ‘या कालावधीत पावसाळा असल्यामुळे धरणीचे रूप बदललेले असते.

आ. पावसाचा भर असल्यामुळे फारसे स्थलांतर घडत नाही. त्यामुळे चातुर्मास्य व्रत एका स्थानी राहूनच करावे, असा प्रघात पडला. एकाच जागी बसून ग्रंथवाचन, जप, नामस्मरण, अध्ययन, साधना करणे, या उपासनेस महत्त्व आहे.

इ. मानवाचे मानसिक रूपही बदललेले असते. देहातील पचनादी संस्थांचे कार्यही निराळ्या ढंगात चाललेले असते. अशा वेळी त्यास अनुसरून कंद, वांगी, चिंचा इत्यादी खाद्यपदार्थ टाळण्यास सांगितले आहेत.

ई. परमार्थाला पोषक गोष्टींचा विधी आणि प्रपंचाला मारक गोष्टींचा निषेध हे चातुर्मासाचे वैशिष्ट्य होय.

उ. चातुर्मासातील श्रावण महिना विशेष महत्त्वाचा आहे. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षात महालय श्राद्धे करतात.’

ऊ. चातुर्मासात सण आणि व्रते अधि प्रमाणात असण्याचे कारण : श्रावण, भाद्रपद, आश्विन आणि कार्तिक या ४ मासांत (चातुर्मासात) पृथ्वीवर येणार्‍या लहरींत तमोगुण अधिक असलेल्या यमलहरींचे प्रमाण अधिक असते. त्यांना तोंड देता यावे; म्हणून सात्त्विकता वाढवणे आवश्यक असते. सण आणि व्रते यांद्वारे सात्त्विकता वाढत असल्याने चातुर्मासात अधिकाधिक सण आणि व्रते आहेत.

शिकागो मेडिकल स्कूलचे स्त्रीरोगतज्ञ प्रोफेसर डॉ. डब्ल्यु.एस्. कोगर यांनी केलेल्या संशोधनात जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या ४ मासांत, विशेष करून भारतामध्ये, स्त्रियांना गर्भाशयासंबंधी रोग चालू होतात किंवा वाढतात, असे आढळले.

– (संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘धार्मिक उत्सव आणि व्रते यांमागील शास्त्र’)