लंडनमधील ‘आय्.आय्.एफ्.एल्.’ या संस्थेने ‘इन्स्टिट्यूट फॉर दी इम्पॅक्ट ऑफ फेथ इन लाईफ’, म्हणजे ‘श्रद्धेचा जीवनावर प्रभाव पडण्याचा अभ्यास करणे’, या वैशिष्ट्यपूर्ण विषयावर संशोधन केले. यामध्ये हिंदु, मुसलमान आणि ख्रिस्ती या प्रमुख ३ धर्मियांचेही सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणानंतर या संस्थेकडून हिंदु, मुसलमान, ख्रिस्ती या प्रमुख धर्मियांसह अन्य धर्मातील धार्मिक लोक आणि पर्यावरणवादी यांच्या सखोल मुलाखती घेण्यात आल्या. यामध्ये ब्रिटनमधील हिंदू अन्य धर्मियांपेक्षा सर्वाधिक पर्यावरणपूरक असल्याचे त्यांना आढळून आले. विशेष म्हणजे अन्य धर्मियांच्या तुलनेत हिंदू कितीतरी टक्के अधिक पर्यावरणाविषयी संवेदनशील असल्याचे या सर्वेक्षणात आढळून आले. ही गोष्ट अशासाठी वैशिष्ट्यपूर्ण ठरते की, भारतात स्वत:ला विज्ञाननिष्ठ, पुरोगामी ठरवणारी मंडळी स्वत:ला पर्यावरणाची किती काळजी आहे, असा दिखावा करण्यासाठी ‘होळीला झाडे तोडू नका’, ‘महाशिवरात्रीला शिवपिंडीवर दूध अर्पण करू नका’, ‘गणेशोत्सवामध्ये मूर्ती नदीमध्ये विसर्जित करू नका’, ‘दिवाळीत फटाके वाजवू नका’, अशा प्रकारे हिंदूंच्या सणांच्या वेळी ‘आपण स्वत: कसे पर्यावरणवादी आहोत’, असा आव आणतात. अशा उचापती करणार्या या मंडळींचे असे हे भुरकट पर्यावरणप्रेम केवळ न केवळ हिंदूंच्या सणांच्या वेळी गदगदून येते आणि अन्य धर्मियांच्या धार्मिक उत्सवाच्या वेळी मात्र गायब होते. अगदी रस्त्यावरील श्वापदे, मांजरे यांना शोधून शोधून बिस्किटे आणि दूध देणारी ही मंडळी हिंदूंना पवित्र असलेल्या गोमातेला गोग्रास देतांना कधीही आढळणार नाहीत. बळीप्रथा बंद आहे; परंतु हिंदूंच्या कोणत्या उत्सवामध्ये बोकडाचा बळी दिला गेला की मात्र ही मंडळी हिंदु धर्मावर सडकून टीका करतात. या वेळी पोटदुखी होणार्या या मंडळींच्या हृदयात बकरी ईदच्या दिवशी लाखो बोकड, बैल, गायी यांच्या हत्या केल्या, तरी त्यांना दयेचा पाझर फुटतच नाही. हे आहे भारतातील पुरोगामी मंडळींचे पर्यावरणप्रेम, भूतदया इत्यादी ! त्यामुळे ब्रिटनमधील संस्थेने संशोधन करून ‘सर्व धर्मियांमध्ये हिंदू सर्वाधिक पर्यावरणपूरक आहेत’, असे म्हणणे म्हणजे भारतातील कथित पुरोगामी आणि पर्यावरणप्रेमी यांचे कान टोचण्यासारखे आहे.

‘तुम्ही कोणत्या देवावर विश्वास ठेवता, यावर तुम्ही अधिक पर्यावरणपूरक आहात कि नाही ?, हे ठरते’, हा एक महत्त्वाचा निष्कर्ष या सर्वेक्षणात काढण्यात आला. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की, हिंदु धर्मामध्ये पर्यावरणाचा विचार सर्वाधिक करण्यात आला आहे. हिंदूंसाठी ही गोष्ट काही नवीन नाही. ‘पाचामुखी परमेश्वर’ ही हिंदु धर्माची शिकवणच आहे. ‘भगवंत सर्वव्यापी आहे. चल-अचल, सजीव-निर्जीव अशा सर्वांमध्ये परमेश्वर वास करतो’, ही हिंदु धर्माची शिकवण आहे. कोणत्या निर्जीव वस्तूला चुकीने पाय लागला, तरी हिंदू नमस्कार करतात. सकाळी उठल्यावर भूमीवर पाय ठेवण्यापूर्वी ‘समुद्र वसने देवी…’ हा श्लोक म्हणून हिंदू धरणीमातेला प्रणाम करतात आणि मग भूमीवर पाय ठेवतात. येथे नदीला माता समजले जाते आणि वृक्षाला कल्पतरू ! हिंदूंचे दैवत हे केवळ अन्य धर्मियांतील प्रेषितांपुरते मर्यादित नाही. हिंदू पर्यावरणपूरक असण्याचे गमक यामध्येच आहे. जगातील अन्य कोणत्याही पंथामध्ये अशी व्यापकतेची भावना नाही. पुरोगामी किंवा पर्यावरणप्रेमी यांना जर खरोखरच पर्यावरणाविषयी प्रेम वाटत असते, तर त्यांनी हिंदु धर्माचा अभ्यास केला असता. जे लोक निसर्गाला उपद्रव पोचवतात, त्या हिंदूंनाही धर्मानुसार आचरण करण्याचे आवाहन केले असते; परंतु ही मंडळी तसे करत नाहीत. उलट जिथे संधी मिळेल, तेथे हिंदु धर्मावर अभ्यासहीन टीका करतात.
‘बीफ’चा ढेकर देऊन प्राणीप्रेम !
हिंदु परंपरेनुसार सूर्यास्तानंतर झाडाची फुले, पाने तोडत नाहीत. भूमी खणत नाहीत; याचे कारण ती झोपलेली असतात. हिंदु धर्माच्या पर्यावरणपूरकतेचे आणखी कोणते उदाहरण द्यायला हवे ? स्वत:ला पर्यावरणवादी म्हणणार्यांचे पर्यावरणप्रेम केवळ हिंदूंच्या सण-उत्सवांच्या वेळी जागृत होते; मात्र हिंदु परंपरेतील अशा अनेक पर्यावरणाची काळजी घेणार्या परंपरा ते कधी स्वत: पाळतात का ? सूर्योदयानंतर उठणे, हे हिंदु धर्मपरंपरेनुसार भूमीला भार समजले जाते. त्यामुळे सूर्योदयापूर्वी उठण्याची शिकवण हिंदु धर्म देतो. स्वत:ला पर्यावरणप्रेमी म्हणवणारे पर्यावरणाविषयी इतके संवेदनशील असतात का ?

बाहेर प्राणीप्रेम दाखवून ‘बीफ’चा ढेकर देणार्या या पुरोगामी मंडळींना हिंदु धर्मप्रेमींनी याचा जाब विचारायला हवा. ब्रिटनमधील नागरिकांना संशोधनात आढळलेल्या या गोष्टी नाविन्यपूर्ण वाटल्या असतील; परंतु हिंदु धर्माचे पालन करणार्या प्रत्येकाच्या जीवनातील या नियमितच्या गोष्टी आहेत. याचे सर्व मूळ सनातन धर्माच्या शिकवणीतच आहे. त्यामुळे अशा प्रकारचे संशोधन करणार्या ‘आय्.आय्.एफ्.एल्.’ या संस्थेने हिंदु धर्मच समजून घेतला, तर त्याची व्यापकता तिच्या लक्षात येईल. भारतातील पुरोगामी हिंदु धर्मावर टीका करतात, याचे कारण ते जिज्ञासू नाहीत, तर केवळ टीकाखोर आणि हिंदुद्वेषी आहेत. अज्ञानातून केलेली टीका ज्ञान प्राप्त झाल्यावर दुरुस्त होते; परंतु द्वेषभावनेने आणि जाणीवपूर्वक केलेली टीका कूपमंडूक बनवते. हिंदु धर्मावर द्वेषभावनेतून टीका करणारी मंडळी पुरोगामी असू शकत नाहीत.
होळीतील पोळीची चिंता; वाया जाणार्या अन्नाचे काय ?
या पुरोगाम्यांची भूतदया किती पोकळ आहे, याचे उदाहरण म्हणजे मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन समिती होळी आली की, पोळी दान करण्याचे आवाहन करते. खरे तर होळी वर्षातून एकदा येते. त्या वेळी हिंदु समाज श्रद्धेने होळीमध्ये पोळी दान करतो. ‘पोळी होळीत टाकण्यापेक्षा गरिबाला दिली, तर त्याचे पोट भरेल’, असा प्रचार ही मंडळी करतात. यातून या मंडळींना गरिबांची किती चिंता वाटते, असे वाटते. असे असेल, तर वर्षभरात लग्नादी समारंभाच्या वेळी एक पोळी नव्हे, तर कितीतरी अन्न उकिरड्यावर टाकून दिले जाते, म्हणजे होळीत दान केलेल्या एका पोळीपेक्षा वर्षभरात कायमच होणार्या विविध समारंभांमध्ये अन्न वाया जाण्याचे प्रमाण कितीतरी पटींनी अधिक आहे. हे वाया जाणारे अन्न जर गरिबांना मिळाले, तर कितीतरी जणांचे पोट भरेल; पण याविषयी हे अंनिसवाले कधी जनजागृती करत नाहीत. जनजागृती राहू द्या, याविषयी साधे आवाहनही करण्याची तसदी ही मंडळी घेत नाहीत; कारण या मंडळींना लग्नादी समारंभामध्ये वाया जाणार्या अन्नपदार्थांचे काही एक पडलेले नाही; मात्र होळीतील एका पोळीला मात्र विरोध करायचा. यामागे या मंडळींचा केवळ न केवळ हिंदुद्वेष आहे. अशी मंडळी पर्यावरणपूरक नाहीत, तर विरोधक आहेत, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे !
होळीतील पोळीची चिंता करणारे, समारंभात वाया जाणार्या अन्नाविषयी चिंता का करत नाहीत ? |