होळीचा इतिहास, विधी आणि तिच्याविषयी केल्या जाणार्‍या अपप्रचाराचे खंडण

आज ‘होळी’ आहे. त्या निमित्ताने…

१. होळीची नावे

होळी हा सण फाल्गुन पौर्णिमेला येतो. देशपरत्वे फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंतच्या ५ – ६ दिवसांत कुठे २ दिवस, तर कुठे ५ दिवस हा उत्सव साजरा केला जातो. उत्तरेत हा उत्सव होरी, दौलायात्रा या नावाने, गोवा आणि महाराष्ट्र या राज्यांत शिमगा, होळी, हुताशनी महोत्सव किंवा होलिकादहन या नावाने, बंगालमध्ये दौलायात्रा म्हणून, तर दक्षिणेत कामदहन या नावाने ओळखला जातो.

२. होळीचा भावार्थ

दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सत्प्रवृत्तीचा मार्ग दाखवणारा उत्सव म्हणजे होळी !

३. इतिहास

पूर्वी ढुंढा किंवा ढौंढा नामक राक्षसी गावात शिरून लहान मुलांना पीडा द्यायची. ती रोग निर्माण करायची. तिला गावाबाहेर हाकलून देण्याकरता लोकांनी पुष्कळ प्रयत्न केले; पण ती जात नव्हती. ‘नगरातील मुलांना त्रास देणार्‍या ‘ढुंढा’ नावाच्या राक्षसिणीचा प्रतिकार कसा करावा ?’, याविषयी नारदमुनी सम्राट युधिष्ठिराला उपाय सांगतात की, वाळलेली लाकडे आणि गोवर्‍या यांचा ढीग रचून रक्षोघ्न, म्हणजे राक्षसांचा नाश करणार्‍या मंत्रांनी अग्नी प्रज्वलित करावा. अग्नीला ३ प्रदक्षिणा घालून आनंदाने टाळ्या वाजवाव्यात आणि हसावे. या कृतीमुळे पापी राक्षसीण क्षीण होईल आणि निघून जाईल. भविष्योत्तर पुराणात याचा उल्लेख आहे.

४. विधी

‘सायंकाळी किंवा रात्री होळी करतांना श्री होलिकापूजनाचे स्थान शेणाने सारवून अन् रांगोळी घालून सुशोभित करावे. मधोमध एरंड, माड, पोफळी अथवा ऊस उभा करून त्याच्या भोवती गोवर्‍या आणि सुकी लाकडे रचावी. पूजा करणार्‍यांनी शुचिर्भूत होऊन आणि देशकालाचा उच्चार करून संकल्प करून पूजा करावी अन् नैवेद्य दाखवावा. त्यानंतर ‘होलिकायै नमः ।’, असे म्हणून होळी पेटवावी. होळी पेटल्यावर होळीला प्रदक्षिणा घालावी आणि तोंडावर उलटा हात ठेवून बोंब मारावी. श्री होलिकादेवतेला पुरणपोळीचा नैवेद्य, नारळ अर्पण करावा. मग जमलेल्या लोकांना त्याचा प्रसाद द्यावा. होळी पूर्ण जळल्यानंतर ती दूध अन् तूप शिंपडून शांत करावी’, असा होळीचा विधी आहे.

५. अपप्रचाराचे खंडण

सध्या अनेक ठिकाणी होळीच्या संदर्भात ‘कचर्‍याची होळी करा किंवा पुरणपोळी होळीला अर्पण न करता ती गरिबांना द्या’, असे आवाहन केले जाते. विशेष म्हणजे असे आवाहन करणार्‍या तथाकथित पुरोगाम्यांना पर्यावरणप्रेमाचा किंवा समाजकार्याचा उमाळा केवळ हिंदूंच्या सणांच्या वेळीच येतो. वर्षभर होणारी वृक्षतोड,

प्रदूषण यांविषयी ते लोक कधी बोलत नाहीत. त्यामुळे होळीच्या निमित्ताने होणार्‍या धर्मविरोधी आवाहनांना न भुलता पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करायला हवी; कारण शास्त्रशुद्ध पेटवलेल्या होळीतून प्रदूषण होत नाही, तर वातावरणाची शुद्धी होते.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘सण साजरे करण्याच्या योग्य पद्धती’)